आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांविरुद्ध हायकोर्टात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या सभांमध्ये अनेक ठराव एकमताने मंजूर केले जातात. परंतु, प्रशासन त्या ठरावांची अंमलबजावणी करत नाही आणि ते विखंडनासाठीही पाठवत नाही. प्रशासनाच्या अशा कामचुकार भूमिकेमुळे आयुक्तांविरुद्ध उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्याची घोषणा सभागृहनेते रमेश जैन यांनी केली.
महापालिकेचे उपमहापौर सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महासभा पार पडली. गेल्या महासभेत आस्थापनेवरील अधिकाऱ्यांची मंजूर पदे महापालिकेने आपल्या अधिकारात भरावी त्यात पारदर्शकता यावी म्हणून पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी, असा ठराव केला होता. या सभेत त्यावर प्रशासनाचे कायदेशीर मत मागवण्यात आले होते. प्रशासनाने यासंदर्भात अभिप्राय देताना अशी समिती स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रमेश जैन यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रशासन सभागृहाची दिशाभूल करत आहे. तसेच सभागृहाला शासनाचे नियम मान्य असून, त्यांचा भंग करायचा नाही. केवळ महापालिकेला जे अधिकार आहेत ते मिळायला हवेत, एवढीच रास्त अपेक्षा असल्याचे स्पष्ट करून प्रशासनाने केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी भांडले
यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नसल्याने अक्षरश अधिकाऱ्यांशी भांडले. तीन-तीन महिने पगार होत नसतील, तर त्यांचे घर कसे चालणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत प्रशासनाने आधी धोरण जाहीर करावे, अशी भूमिकाही नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे दोन महिन्यांचे पगार करत असल्याची घोषणा उपायुक्त प्रदीप जगताप यांनी केली.
शहरविकास सल्लागार समितीला विरोध
शहराचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांची शहर विकास सल्लागार समिती स्थापन करण्यास भाजप, मनसे राष्ट्रवादीने विरोध केला. आम्ही ज्या भागातून निवडून येतो त्या ठिकाणचे मतदार हे डॉक्टर, इंजिनिअर, वकील असे उच्चशिक्षित असतात. त्यांचेच प्रतिनिधित्व आम्ही करताेय म्हटल्यावर नवीन समितीची गरज नसल्याचे मत या वेळी विरोधकांनी व्यक्त केले.
भंगाळे, जोशींमध्ये वाद
ओपन स्पेस ताब्यात घेण्यावर महासभेत चर्चा सुरू होती. नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या प्रभागातील ही जागा आहे, तर दुसऱ्या नगरसेविका मनसेच्या आहेत. त्यांची बाजू मनसेचे अनंत जोशी मांडत होते. शहरातील सर्वच ओपन स्पेससाठी एकच नियम लावावा, अशी मागणी करत असताना भंगाळे यांनी हा माझ्या प्रभागातील विषय आहे. परंतु, कोणी कुठेही तोंड खुपसते, असा आरोप केला. त्यावरून जोशी भडकले. तुम्ही एक शब्द बोलत असाल तर मी चार शब्द बोलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
मी यापुढे सभागृहात नसेन
प्रशासन सातत्याने प्रत्येक गोष्टीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करते. महासभेत नेहमी ठराव होतात. परंतु, त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मी स्वत: आयुक्तांविरुद्ध रिट पिटीशन दाखल करणार आहे. तसेच शक्य तोवर पुढील पाच वर्षांत मी सभागृहात येणार नसल्याची घाेषणा करत येणाऱ्या तरुण नगरसेवकांना याची माहिती व्हावी. असे काम करून जाणार आहे, असा सूचक इशाराही रमेश जैन यांनी या वेळी दिला.
बातम्या आणखी आहेत...