आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटची मालमत्ता 600 कोटींची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या जळगाव महापालिकेच्या मालमत्तांवर टाच आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापैकी फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटच्या मालमत्तेची किंमत 600 कोटींपेक्षा जास्त निघाल्याचे सांगितले जात आहे. हुडको आणि ऋणनिर्देश न्यायालयातर्फे (डीआरटी) करण्यात आलेल्या मूल्यांकनात ही बाब उघड झाली आहे. मूल्यांकनानंतर डीआरटी न्यायालय काय निर्णय देते? याबाबत व्यापारी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

शहरातील घरकुलासह विविध 21 योजनांसाठी तत्कालीन नगरपालिकेने सन 1990पासून वेळोवेळी हुडको या वित्त संस्थेकडून 141 कोटी 34 लाख 83 हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची फेड व्यवस्थित होत नसल्याने जून 2011पर्यंत या कर्जाच्या रकमेतील मुद्दल 129 कोटी 92 लाख तर व्याज 120 कोटी 14 लाख व जिल्हा बॅकेचे कर्ज असे मिळून 308 कोटींचे कर्ज पालिकेवर आहे.

कर्जाची परतफेड होत नसल्याने हुडकोने जून 2011 मध्ये ऋणनिर्देश न्यायालयात (डीआरटी) धाव घेत थकित रकमेतील किमान 130 कोटी रुपये एकरकमी व त्यानंतर उर्वरित रकमेची फेड हप्त्याने व्हावी असा दावा दाखल केला आहे. महापालिकेने रक्कम न भरल्यास फुले, सेंट्रल फुले, गोलाणी मार्केट या मालमत्तांवर टाच येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची धावपळ वाढली आहे.

पुढे काय?
पालिकेच्या सूत्रांकडून 600 कोटीचे मूल्यांकन सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात डीआरटी कोर्टाकडे नेमका काय अहवाल सादर होतो व त्यातून काय निर्देश मिळतात, यावर व्यापारी तसेच पालिकेची भूमिका अवलंबून राहणार आहे. या मूल्यांकनाचा प्रत्यक्ष आकडा कमीही होण्याची शक्यता आहे.

महापालिका होऊ शकते मालामाल
पालिकेच्या फुले मार्केटमध्ये 689 गाळे तर सेंट्रल फुले मार्केटमध्ये 260 असे एकूण 949 गाळे आहेत. या मार्केटचे मूल्यांकन 600 कोटी रुपये निघाले आहे. पालिकेवर हुडकोचे 191 तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 80 कोटी 60 लाख रुपये कर्ज आहे. 600 कोटींची मालमत्ता विक्रीतून 271 कोटींचे कर्ज एक रकमी फेडल्यावरही पालिकेच्या तिजोरीत 329 कोटी रुपये शिल्लक राहू शकणार आहेत. मात्र, फुले मार्के ट उभे असलेली जागा राज्य शासनाची असल्याने विक्रीपूर्वी शासनाची परवानगीची अडचण येऊ शकते.

आयुक्तांशी चर्चा
हुडकोतर्फे मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेपासून व्यापार्‍यांच्या विविध गटांनी येऊन आयुक्तांशी चर्चा केली. 949 गाळ्यांचे 600 कोटी मूल्यांकन गृहित धरल्यास प्रतिगाळा सरासरी 63 लाख 22 हजार 444 रुपये किंमत निघते. प्रत्यक्षात या किमती आणि बाजार भावात प्रचंड तफावत असल्याने व्यापारी अस्वस्थ झाले आहेत.

दोन वर्षापासून प्रकरण न्यायालयात
दोन वर्षापासून वेळोवेळी सुनावणी सुरू असून न्यायालयाने पालिकेस 130 कोटी रुपये भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र एवढी मोठी रक्कम एकरकमी भरणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेतर्फे सादर केले होते. एवढी मोठी रक्कम उभी करण्यासाठी पालिकेतर्फे शहरातील आठ व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांकडून फेर प्रीमियम आकारणीची प्रक्रिया सुरू असल्याचे कळविले होते. मात्र, मार्ग निघत नसल्याने डीआरटीचे मूल्यांकन अधिकारी किशन नेनवाणी, हुडकोचे दिलीप भोसले यांनी बुधवारी फुल, सेंट्रल फुले, गोलाणी मार्केट व पालिकेच्या इमारतीचे मूल्यांकन केले आहे.

तीन बाबींवर होते मूल्यांकन
एखाद्या भागातील वास्तूचे शासकीय मूल्यांकन, चालू बाजारभाव या प्राथमिक बाबी असतात. मात्र, 1 लाखाची किंमत निघूनही संबंधित वस्तू घेण्यासाठी ग्राहकच नसेल तर त्या मूल्यांकनाला महत्त्व नसते. त्यामुळे शासकीय मूल्यांकन, चालू बाजारभाव त्यानंतर मागणी हा घटक महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर वास्तूची मजबुती, सुसज्जता या बाबी मूल्यांकनासाठी महत्त्वाच्या ठरतात. अविनाश सोनी, शासकीय मूल्यांकन अधिकारी