आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटमधील गाळेधारकांच्या मनधरणीसाठी एजंट सक्रिय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीपूर्वी व्यापारी संकुलांतील गाळेधारकांचा वाद संपुष्टात आणून हुडकोचे कर्ज भरण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर फुले व सेंट्रल फुले गाळेधारकांचे मन वळवून आलेला प्रस्ताव किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्यासाठी काही एजंट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पालिकेकडून अद्याप दुकानांच्या किमती निश्चित झाल्या नसल्या तरी, मार्केट परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

महापालिकेवरील कर्जाची रक्कम मिळण्यासाठी हुडकोने डीआरटी कोर्टात दावा दाखल केला आहे. तसेच महापालिकेच्या मालमत्तांवर टाच आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार महात्मा फुले मार्केट परिसरातील अन्य मार्केटचे मूल्यांकनही नुकतेच करण्यात आले आहे. दरम्यान, वरवर 600 कोटींचे मूल्यांकन असले तरी ते अंतिम नसल्याचे सांगितले जात आहे; परंतु निवडणुकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हुडकोची रक्कम भरण्यासाठी पालिकापातळीवर जोरदार प्रय} सुरू आहेत. त्यामुळे यापूर्वी केलेल्या ठरावानुसार गाळ्यांच्या किमती कशी योग्य आहेत, हे पटवून देण्याचा प्रय} केला जात आहे. त्यासाठी गाळेधारकांशी निगडित काही जण थेट गाळेधारकांना व्यक्तिगत भेटी घेत आहेत.

जनता दरबारातील उत्तरामुळे संभ्रम
सेंट्रल फु ले मार्केटमधील गाळ्यांचा नवीन करार वाढवण्याबाबत रमेश कापुरे यांनी जनता दरबारात अर्ज दिला होता. त्यात मिळालेल्या उत्तरानुसार सेंट्रल फुले मार्केट व इतर काही मार्केट्समधील व्यापारी व मनपात न्यायालयीन वाद सुरू आहे. तसेच याबाबत अद्याप कोणताही निर्णय लागलेला नसून, नवीन धोरण ठरवण्यात आले नसल्याचे पालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.

दुजाभावाच्या भावनेने नाराजी
रेल्वे स्टेशन चौकातील 19 दुकानदारांच्या दुकानांची जागा वापरण्यास मुदतवाढ देण्याबाबत 12 एप्रिल 2005 रोजी स्थायी समिती सभेत निर्णय घेण्यात आला. त्यात 31 जानेवारी 2004 रोजी मुदत संपलेल्या दुकानांचे बाजारभावाप्रमाणे भाडे आकारून नऊ वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाला एक आणि इतरांना दुसराच न्याय दिला जात असल्याचे गाळेधारकांमध्ये बोलले जात आहे.

16 जुलैला होणार सुनावणी
मार्केटमधील दुकाने रिकामी करण्यासंदर्भात आयुक्तांनी काढलेल्या आदेशाविरोधात न्यायाधीश इंदिरा जैन यांच्या न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. त्यात 300 दुकानदारांच्या अर्जावर 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

अशा असू शकतात किमती
फुले मार्केटच्या तळमजल्यावर 92 हजार 900 रुपये प्रतिचौरसमीटर प्रीमियमचा प्रस्ताव आहे. तसेच तळमजल्यावर आतील बाजूला 74 हजार 320 रुपये, मेझेनाइनसाठी 92 हजार 900 रुपये, मेझेनाइन (आतील बाजू) साठी 74 हजार 320 रुपये, पहिल्या मजल्यावर 74 हजार 320 रुपये व पहिला मजल्या (आतील बाजू) वर 59 हजार 456 रुपये प्रतिचौरसमीटर देण्याची तयारी सुरू आहे. तसेच सेंट्रल फुले मार्केटमध्ये तळमजल्यावर आठ लाख रुपये, लोअर तळमजल्यावर सात लाख रुपये, पहिल्या मजल्यावर सहा लाख व दुसर्‍या मजल्यावर पाच लाख रुपये असल्याचे गाळेधारकांमध्ये बोलले जात आहे. तथापी, यासंदर्भात पालिका अधिकार्‍यांकडून अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगितले जात आहे.