आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइपलाइनसह जलकुंभ कामाला नव्याने सुरुवात; जागेचे परीक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या १३६ काेटींच्या याेजनेला लागलेला ब्रेक निघाला अाहे. जीवन प्राधिकरण विभागाने याेजना हाती घेतली अाहे. त्यातील कामेही सुरू झाली अाहेत. देवपूरमधील बिजलीनगर परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले असताना जलकुंभांच्या कामालाही नवरात्रीचा मुहूर्त लाभला. जय हिंद कॉलनी परिसरात आनंदनगर तुळशीरामनगरात जलकुंभांच्या कामाला नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे काम रखडले. त्यातील तुळशीरामनगरात जलकुंभाच्या जागेवरील मातीचे परीक्षण करण्यात येत अाहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली अाहे.
जीवन प्राधिकरण विभागाने पावसाळ्याच्या अखेरीस याेजनेच्या कामाला नव्याने सुरुवात केली. यात शहराबाहेरील कॉलनी परिसरात पाइपलाइनद्वारे नवीन जोडणी केली जाणार अाहे. पूर्वीच्या ठेकेदाराने चक्करबर्डी येथे जलकुंभाचे काम सुरू केले होते. त्याच्या पायाभरणीनंतर ते काम थांबले होते, तर आता सद्य:स्थितीत मजीप्राने मोहाडी उपनगरात चितोड रोडवरील शाळा नंबर २८ येथे जलकुंभाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी जलकुंभाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यानंतर जलकुंभापासून होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम या परिसरात सुरू आहे. शहरात योजनेत एकूण सात जलकुंभ बांधावयाचे आहेत. त्यानुसार शहरातील इतर भागांत जलकुंभाचे काम सुरू झालेले नव्हते. त्यात जय हिंद कॉलनी भागातील आनंदनगर तुळशीरामनगर येथे जलकुंभ उभारायचे आहेत. हे जलकुंभ या भागातील मोकळ्या जागेवर उभारण्यात येत अाहेत. त्याला जय हिंद कॉलनीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे जलकुंभाच्या कामाला विलंब होत होता. तुळशीरामनगरातही याला विरोध होता. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यानंतर आता तुळशीरामनगरात जलकुंभाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी प्राथमिक कामासाठी त्या जागेचे माती नमुने घेण्यात येऊन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात परीक्षणासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर जलकुंभाचे डिझाइन तयार करण्यात येत आहे. त्याप्रमाणे खोदकाम करण्यास सुरुवात होईल. डिझाइनला मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी मंजुरी दिल्यावर बांधकाम सुरू होणार आहे. या प्रकारे कामाची सुरुवात झाली असून, मैदान स्वच्छ करण्यात आले आहे. साहित्य बाजूला ठेवण्यात आले आहे. आनंदनगर जागेचेही माती नमुने घेण्यात येणार अाहेत.

दोन जलकुंभांची जागा निश्चित होणार
शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामात नवीन पाइपलाइन टाकणे जलकुंभ बांधण्याचे काम करण्यात येत अाहे. नवीन पाइपलाइन साधारणपणे ३५० किलोमीटर टाकावयाची आहे, तर नवीन सात जलकुंभ बांधण्यात येणार आहे. यात मोहाडी, चक्करबर्डी, आनंदनगर, तुळशीरामनगर येथे काम होत आहे. नगावबारी येथे लवकरच काम सुरू होणार आहे.
तुळशीरामनगरातील याच जागेचे परीक्षण करून साहित्य आणले आहे.
कामाला लवकरच प्रारंभ
^शहरात पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मजीप्राकडून सुरुवात झाली आहे. यात जलकंुभांचे काम करण्यात येत आहे. त्याकरिता महापालिकेने जागा निश्चित केल्या आहेत; परंतु यातील काही जागांवर नागरिकांचा विरोध होता. त्यासंदर्भात नागरिकांशी चर्चा करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात येत अाहे. त्याप्रमाणे जलकुंभांचे काम लवकरच सुरू होणार आहे. -कैलासशिंदे, अभियंता,महापालिका

यासाठी नागरिकांचा विरोध
तुळशीराम नगर तसेच आनंदनगर परिसरात नागरिकांनी बगिचा तसेच पदपथ तयार करण्यात यावा यासाठी जागेची मागणी केली होती. म्हणूनच जलकुंभाच्या जागेलाही विरोध केला होता. गेल्या काही दिवसांपासून हा विरोध वाढलाही होता. विकास कामांमध्ये अद्याप या वॉर्डांमध्ये बगिच्यांची सुविधा तसेच वॉकिंग ट्रॅक झालेला नाही. त्यासाठी ही जागा पाहिजे, असे नागरिक म्हणत होते.

४५ लाख लिटर क्षमता...
महापालिका पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शहराला सुरुवात झालेली आहे. यात आता जलकुंभांचे काम होत आहे. योजनेचे काम आता मूळ निविदेप्रमाणे होत आहे. त्यात मुख्य साठवणूूक जलकुंभ हा चक्करबर्डीऐवजी आता नगावबारी येथे होत आहे. त्या ठिकाणी ४५ लाख लिटरचा जलकुंभ आहे. त्यानुसार येथे दोन जलकुंभ विभागून घेण्यात येत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...