आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओची धुलाई, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन शाळकरी मुलींचा पाठलाग करून दररोज छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओची मंगळवारी पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. आठवडाभरापासून दररोज पाठलाग करून त्याने या तीन मुलींना भंडावून सोडले होते. मंगळवारी सकाळी त्याने हद्द केली. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्याने शहर पोलिस ठाण्याच्या समोरच मुलींची छेड काढली. मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता पुन्हा पाठलाग करीत असताना पोलिसांनी रोडरोमिओला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. 

 

शहरातील जिल्हापेठ भागातील एका शाळेत नववी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी कांचननगर परिसरात राहतात. त्यांची छेड काढणारा तरुणही अल्पवयीन ( १७ वर्षे) असून तो त्याच परिसरात राहतो. गेल्या आठवडाभरापासून तो तिन्ही मुलींच्या मागावर होता. घरापासून शाळेपर्यंत आणि शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पाठलाग करून त्याने मुलींना भंडावून सोडले होते. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता तिन्ही विद्यार्थिनी सायकलवरून शाळेत जात असताना शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर टवाळखोराने त्यातील एका मुलीला थांबवून तिची छेड काढली. तिच्याशी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर देखील त्याने बोलण्याची जिद्द धरली. भीतीपोटी मुली सायकलीचा वेग वाढवून कशाबशा शाळेत पोहोचल्या. या प्रकारामुळे प्रचंड घाबरल्याने त्या मुलींना शाळेतच रडू कोसळले. शाळा सुटल्यावर पुन्हा हा रोडरोमिओ आपला रस्ता अडवले, या भीतीने त्या हमसून हमसून रडत होत्या. या वेळी त्यांच्या वर्गशिक्षकांनी रडण्याचे कारण विचारत विचारपूस केली. मुलींना आपबिती कथन केल्यानंतर शिक्षकांना घटनेचे गांभीर्य लक्षात आले. 

 

मुलींच्या सुरक्षेच्या उद्देशाने त्यांनी तत्काळ तिघींच्या पालकांना माहिती दिली. तसेच पालकांना शाळेत बोलावून घेतले. नेहमीप्रमाणे दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यावर एका मुलीचे वडील मित्रासह दुचाकीने त्यांच्या मागून निघाले. टवाळखोराने पुन्हा रोजच्या प्रमाणे गोलाणी मार्केटपासून मुलींचा पाठलाग सुरू केला. परंतु मुलींच्या सोबत एकीचे वडील असल्याचे समजताच त्याने रस्ता बदलवला. अखेर काही मिनिटांतच त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. परंतु या प्रकारामुळे त्या तिन्ही मैत्रिणी प्रचंड भयभीत झाल्या होत्या. 

 

पळून जाणाऱ्या टवाळखाेरास पाेलिसांनी पाठलाग करून पकडले 
मुलींनी पालकांसह दुपारी १२.३० वाजता शहर पोलिस ठाणे गाठले. रोडरोमिओचे वर्णन पोलिसांना सांगत असतानाच तो पोलिस ठाण्याबाहेर उभा असल्याचे दिसून आले. मुलींनी तत्काळ त्याला ओळखून हाच टवाळखोर असल्याचे सांगितले. त्या वेळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्यासह डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीने पाठलाग करून चौबे मार्केटजवळ त्याला पकडले. पोलिस ठाण्यात आणून त्याला चांगलाच ‘प्रसाद’ दिला. पोलिसांची कारवाई पाहून यातील एका मुलीस पोलिस ठाण्यातच भोवळ आल्याने ती जमिनीवर कोसळली. तर इतर दोघी देखील भीतीपोटी रडू लागल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक सारिका कोडापे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांनी मुलींना धीर देत शांत केले. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्या टवाळखोराविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...