आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्‍ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- विविध गुन्ह्यांमध्ये मध्य प्रदेश पोलिसांसह भुसावळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी इराणी मोहल्ल्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. कारवाईत पोलिसांनी दोन संशयीतांसह तीन मोटारसायकली ताब्यात घेतल्या. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व केले.

इंदूर येथे गेल्या मंगळवारी (दि. 21) एका महिलेची सोन्याची साखळी हिसकावून धूम स्टाइलने पळणार्‍या आरोपींच्या दोन मोटारसायकलींपैकी एक स्लीप झाली होती. या घटनेतील एक आरोपी पसार झाला होता, तर दुसर्‍याला नागरिकांनी पकडून चोप दिला होता. पकडलेला आरोपी सादिक इबाबत (वय 18, रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) याला नागरिकांनी इंदूरच्या अन्नपूर्णा पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडे सोपवले. सादिकने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून इंदूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी आरोपी सादिकसह भुसावळ गाठले. पोलिस अधीक्षक एस. जयकुमार वार्षिक तपासणीसाठी शुक्रवारी भुसावळला आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील दोन दंगा नियंत्रण पथके, भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका, वाहतूक शाखा, भुसावळ नियंत्रण कक्ष, जळगाव एलसीबी या सर्व पथकांनी संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशन केले. सुमारे 200 पोलिसांच्या ताफ्यासह डीवायएसपी विवेक पानसरे, पोलिस निरीक्षक सतीश देशमुख, निरीक्षक धनंजय धोपावकर, सहायक निरीक्षक पुंडलिक भोंडवे, ए.ए. पटेल, राजेंद्र जगताप, रवींद्र मानकर, उपनिरीक्षक नीता कायटे, नितीन पाटील, डी. के. शिरसाठ आदी कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला.

मुस्लिम कॉलनीत तपासणी
इराणी मोहल्ल्यातील कारवाईनंतर पोलिसांचा ताफा खडका रोडवरील मुस्लिम कॉलनीत पोहोचला. मुस्लिम कॉलनीत बाबर नावाच्या व्यक्तीच्या घराची ताफ्याने झाडाझडती घेतली. मात्र, तपासणीत संशयित सापडला नाही.

बघ्यांची झाली प्रचंड गर्दी
इराणी मोहल्ल्यात एकाच वेळी 7 ते 8 पोलिस गाड्या आल्यामुळे नेमके काय झाले? हे जाणून घेण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. वाढत्या गर्दीमुळे पोलिसांनी दोन ते तीन वेळा जमावाला पांगवले. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

अधीक्षक तळ ठोकून
पोलिस अधीक्षक एस. जयकुमार हे संध्याकाळपर्यंत डीवायएसपी कार्यालयात बसून होते. डीवायएसपी पानसरे यांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनची माहिती त्यांनी जाणून घेतली.

आरोपीभोवती गोल कडे
मध्य प्रदेशातील इंदूर येथून आलेल्या पथकातील अधिकारी यशवंतसिंह सच्चन, हुकुम शर्मा, संजय खान, ए.एस. यादव, अर्जुन कदम यांचे पथक आरोपीभोवती गोलकडे करून त्याला इराणी मोहल्ल्यात फिरवत होते. आरोपीला बांधले होते.

अशी केली धरपकड
इराणी मोहल्ल्यात जाण्यार्‍या सर्व मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. कारवाईसाठी पोलिसांनी पाच पथके स्थापन केली होती. पाचही पथकांनी सर्व बाजूंनी महिला पोलिसांसह इराणी मोहल्ल्यात शिरकाव केला. अचानक पोलिसांचा ताफा धडकल्याने इराणी मोहल्ल्यात धावपळ उडाली. आरोपी सादिकने दाखवलेल्या घरामध्ये शिरत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांना हवा असलेला भुसावळच्या दंगलीतील आरोपी शौकत अली लाल अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह नजरअली या युवकालाही ताब्यात घेतले. इराणी मोहल्ल्यातून पोलिसांनी तीन मोटारसायकली जप्त केल्या.

महिलांचा आक्रोश
पोलिस घरांची झडती घेत असल्याने इराणी मोहल्ल्यातील महिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आक्रोश केला. शौकत अली या वृद्धाला ताब्यात घेताच महिलांनी पोलिसांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकाराला महिला पोलिसांनी अटकाव करून कारवाई सुरूच ठेवली.