आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारागाड्या ओढताना झालेल्या गोंधळात पोलिसाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळातील जुना सतारे भागात मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. मात्र, त्या ओढताना भगताचे बगले खाली कोसळले. त्यामुळे गाड्यांवर चढलेल्या भाविकांनी खाली उड्या मारल्याने गोंधळ उडाला. त्यात एक पोलिस चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता घडली.

पंचमुखी हनुमान मंदिरापासून संध्याकाळी 6 वाजता बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बारागाड्या ओढत असतानाच भगताचा एक सहकारी (बगले) खाली पडला. बारागाड्या का थांबल्या? हे पाहण्यासाठी गाड्यांवर उभ्या असलेल्या भाविकांनी उड्या मारल्याने गोंधळ उडाला. बारागाड्यांच्या जवळची गर्दी कमी करण्यासाठी बंदोबस्तावर असलेले शहर पोलिस ठाण्याचे हवालदार रमेश र्शावण कुंभार (वय 53) हे रेटारेटीत खाली कोसळले. अंगावरून बारागाड्यांची चाके गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बारागाड्या ओढणार्‍या भगताचे सहकारी राकेश भंगाळे व भगत सुनील भिरूड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डॉ.तुषार पाटील यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बारागाड्यांखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झालेले रमेश कुंभार यांचा मृतदेह 6.40 वाजता शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात आणण्यात आला. रमेश कुंभार हे यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता भुसावळ शहरातील मानकबाग येथील निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई, नातवंडे, सून असा परिवार आहे. ते सेंट अलॉयसीस स्कूलचे शिक्षक प्रदीप कुंभार यांचे वडील होत.