आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू अड्ड्यावरील छाप्यात अॅसिडने भाजलेल्या हवालदाराचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अवैधदारू अड्ड्यावर कारवाई करताना झालेल्या स्फाेटात तालुका पाेलिस ठाण्याचे चार कर्मचारी भाजले हाेते. त्यातील हवालदार अानंदा दगडू माळी (५७) यांना अाैरंगाबाद येथे हलवण्यात अाले हाेते. तेथे उपचार सुरू असताना साेमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या आठवड्यात पोलिस पथकाने शिरूड शिवारात बनावट दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली. त्या वेळी अड्डा नष्ट करताना जमिनीत गाडलेल्या ड्रमचे झाकण उघडले. त्यातील रसायनाचा स्फाेट झाला. त्यामुळे नीलेेश माेरे, अानंदा माळी, राजू वसावे, जितेंद्र साेनार हे चार पोलिस भाजले. त्यात अानंदा माळी सुमारे ९५ टक्के भाजले होते. त्यांना प्रथम जिल्हा रुग्णालय त्यानंतर खासगी रुग्णालयातून अाैरंगाबाद येथे हलवण्यात अाले हाेते. त्यांच्या शरीरात रसायन गेल्याची शंका अाहे. ते चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचा साेमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले अाहे. जिल्ह्यात दारू अड्ड्यावर कारवाई करताना पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना मानली जात अाहे. अानंदा माळी यांचा मृतदेह अाैरंगाबाद येथून एका रुग्णवाहिकेतून दुपारी अडीच वाजता शहरातील त्यांच्या नकाणे राेडवरील संताेष नगरातील निवासस्थानी नेण्यात अाला.
या वेळी अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पाेलिस अधिकारी हिंमत जाधव (धुळे), नीलेश साेनवणे (साक्री), तालुका पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी अादींनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारप्रसंगी पाेलिस दलातर्फे अाठ पाेलिसांनी प्रत्येकी तीन वेळा हवेत गाेळ्या झाडून त्यांना सलामी दिली.

आरोपीला काेठडीतही सेवा?
अाराेपी असलेल्या दिनेश गायकवाड याला पाेलिस काेठडीतही सेवा प्राप्त हाेत अाहे. त्याला भेटण्यासाठी येणारे थेट काेठडीच्या खिडकीपर्यंत जाऊन त्याच्याशी संवाद साधत अाहेत. तसेच अनेक जण पाेलिस ठाण्याच्या अावारात बसून हाेते. त्यांच्याकडून सायंकाळी काही खाद्यपदार्थही अाणल्याची चर्चा अाहे.

वाढीव कलमांसह चाैघांना पाेलिस काेठडी
तालुका पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिनेश गायकवाडला अटक करण्यात अाली. तर अन्य संशयित अाराेपी लखन मधुकर देवरे, दादा शिवराम पारधी रावसाहेब प्रभाकर साेनवणे (सर्व रा.शिरूड) हे काल रविवारी पाेलिसांसमाेर हजर झाले. दिनेश गायकवाडची काेठडीची मुदत संपल्याने त्याच्यासह अन्य तिघांना साेमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात अाले. न्यायालयाने चाैघांना गुरुवार (दि.७) पर्यंत पाेलिस काेठडी दिली. दरम्यान, अानंदा माळी यांचा मृत्यू झाल्याने आता वाढीव कलम ३०४(ब) नुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती पाेलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली.

कारवाईचे अाव्हान
कर्तव्यबजावत असताना पाेलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने दाेषींविरुद्ध कठाेर कारवाईचे पाेलिस प्रशासनासमाेर माेठे अाव्हान अाहे. जिल्ह्यातील बनावट दारूला इतर राज्यातूनही मागणी असते. त्यात अनेकांचा या व्यवसायात सहभाग असल्याने पाेलिसांना कारवाई करताना अडचणी येतात.