आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेवणाचे ताट बदलल्याने पोलिस श्वानाचा हल्ला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जखमी झालेला कर्मचारी
धुळे - केवळवासाच्या साहाय्याने गुन्हेगाराचा शोध घेण्यात पोलिसांना मदत करणा-या पोलिस पथकातील श्वान रॉकीने बुधवारी उच्छाद मांडला. पोलिस कर्मचा-याने रॉकीच्या जेवणाचे ताट बदलले. यावरून संतापलेल्या श्वान रॉकीने कर्मचा-यावरच हल्ला चढवित त्याला रक्तबंबाळ केले. जखमी कर्मचा-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रॉकीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जखमी कर्मचा-याने केली आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या सेवेत कार्यरत असलेल्या रॉकी या श्वानाने नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात नेत्रदीपक प्रदर्शन करीत सर्वांची वाहवा मिळवली. तसेच बँक ऑफ बडोदाच्या लूटप्रकरणातही रॉकीने महत्त्वाची भूमिका बजावत प्रशासनाची इभ्रत वाचविली. मात्र, बुधवारी पोलिसांना रॉकीचे वेगळेच रूप पाहावयास मिळाले. रॉकीच्या या हल्ल्याच्या थरारक कारनाम्याने श्वान पथकातील कर्मचा-यांना चांगलीच धडकी भरली. श्वान पथकातील कर्मचारी राजेंद्र जगन्नाथ जाधव हे सकाळी १० वाजेच्या सुमारास वीरू, लुई आणि रॉकी या श्वानांना जेवण देत होते. एरवी हे काम काझी नामक कर्मचारी करताे. मात्र, बुधवारी काझी हे कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे राजेंद्र जाधव हे तीनही श्वानांना भोजन देण्यासाठी गेले होते. या वेळी रॉकी या श्वानासाठी असलेले ताट जाधव यांच्याकडून चुकून दुस-या श्वानाला दिले गेले. ही बाब रॉकीच्या निदर्शनाला आल्यावर रॉकीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान ताट बदलल्याची बाब जाधव यांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे ते आपल्या कामात मग्न होते. या वेळी अचानक रॉकीने जाधव यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकाराने जाधव भयभीत झाले. रॉकीच्या या असहज प्रकारामुळे इतर कर्मचा-यांनी तत्काळ धाव घेत रॉकीपासून जाधव यांची सुटका केली. त्यात्पूर्वी रॉकीने जाधव यांना रक्तबंबाळ केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉकीला सेवेतून बेदखल करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

यापूर्वीही घडले प्रकार
पोलिसांनाशोधात सदैव मदत करणारा तसेच अग्रेसर ठरणारा रॉकी हा चिडखोर संतप्त वृत्तीचा आहे. यापूर्वीही रॉकीने लुई वीरू या सोबतच्या श्वानांवर हल्ला केलेला आहे. मात्र, कर्मचा-यावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. अशा घटना वाढण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.