भुसावळ : मार्च अखेर हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. मात्र, काही भागात ही मोहीम राबवणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना विरोध करून उघड्यावरील हागणदारी कायम आहे. यामुळे योजनेला हरताळ फासला जात असल्याचे लक्षात आल्याने पालिकेने आता पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतीचे साकडे घालणार आहेत.
वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयाच्या वापरासोबतच पालिकेने उघड्यावरील हागणदारीला आळा बसावा, यासाठी ९० कर्मचाऱ्यांची १८ गुडमॉर्निंग पथके कार्यरत केली आहे. ही पथके दररोज पहाटेपासून शहरातील विविध भागात जाऊन उघड्यावर शौचविधीस जाणाऱ्यांना विरोध करतात. प्रसंगी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी देखील केली जाते. मात्र, एवढे करूनही काही भागात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण तूसभरदेखील कमी झालेले नाही. काही ठिकाणी पथकातील सदस्यांना विरोध करताना आधी पालिकेने सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी. नंतरच शहर हागणदारीमुक्तीच्या वल्गना कराव्यात, अशा कोपरखळ्यादेखील मारल्या जातात.
अधिकाऱ्यांची भेट घेणार
मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत माेरे, बाजारपेठचे चंद्रकांत सराेदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाेलिस प्रशासनाचे सहकार्य मागणार आहेत. प्रामुख्याने ज्या भागात उघड्यावरील शौचविधी रोखण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांना उपद्रवींचा विरोध होतो, माेकळ्या जागांचा वारंवार शाैचासाठी वापर होतो, त्या भागात कारवाईसाठी पाेलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
शासनाचे परिपत्रक
महाराष्ट्र शासनाने अाॅगस्ट २००८ रोजी काढलेल्या परिपत्रकात, उपद्रवी व्यक्ती जाणीवपूर्वक उघड्यावर शाैचविधीस जात असतील, तर त्यांच्याविरुद्ध पाेलिसांनी मुंबई पाेलिस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी. तसेच प्रशासनाने विनंती केली तर पाेलिस यंत्रणेने याेग्य ते सहकार्य करावे, असा उल्लेख आहे. याचा आधार घेत हागणदारीमुक्तीसाठी पालिका पोलिस मदतीचे साकडे घालणार आहे.
- पहाटे आणिसायंकाळी पालिकेची १८ पथके शहरातील कानाकोपऱ्यात फिरून हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना समज देत शासकीय अनुदानातून वैयक्तिक शौचालय बांधकामाचे आवाहन करणेदेखील सुरू आहे. -बी. टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ