आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्तालूटीतील आरोपी पोलिस मगरे बडतर्फ, पुन्हा न्यायालयीन काेठडीत रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दरोडेखोरांना मदत करणारा पोलिस कर्मचारी सुशील मगरे यास अखेर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. मगरे याच्यासह आणखी दोन पोलिस शिपायांना सेवेतून कमी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले. तत्पूर्वी,मगरे याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला होता.दरम्यान, सेवेतून कमी केलेल्या दोन कामचुकार पोलिसांपैकी एक दीड वर्षापूर्वीच पोलिस दलात भरती झाला होता.

 

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मगरेवर अनेक आरोप आहेत. नेरी -जामनेर रस्ता लूट प्रकरणात मगरे याचा सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्याने लूट करणाऱ्या जिगर बोढरे याच्यासह दरोडेखोरांना गावठी कट्टा आणण्यास आणि म्हसावद येथे भाड्याचे घर मिळवून देण्यासही मदत केली होती. त्यानंतर गुन्हेगारांची लवकर सुटका व्हावी यासाठी वकिलांची भेट घेणे , गुन्हेगारांसोबत गुन्ह्यात सहभागी होण्यासारखे काम केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. मगरेमुळे पोलिस दलाची बदनामी झाल्याने त्याच्यावर कारवाई अटळ होती. त्यामुळे भारतीय संविधान अनुच्छेद ३११(२) (ब) या कलमाच्या तरतुदीनुसार मगरे यास पोलिस दलातून बडतर्फ केले आहे.

 

सुशील मगरे याने बुधवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. या अर्जावर न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मगरेचा अर्ज फेटाळला. मगरे याने अट्टल घरफोड्यांना मदत करून त्यांच्या सोबत जबरी लूट केल्याचा गुन्हा जामनेर तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.

 

दोन कामचुकार पोलिस सेवेतून कमी
मगरे शिवायड्यूटीवर सतत गैरहजर राहणाऱ्या पोलिस मुख्यालयातील दोन कामचुकार पोलिस कर्मचाऱ्यांना देखील पोलिस अधीक्षकांनी घरचा रस्ता दाखविला आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. यातच पोलिस मुख्यालयात नेमणूक असलेला आणि दिड वर्षापूर्वीच भरती झालेला पोलिस शिपाई योगेश प्रकाश गिरी शेख रऊफ शेख चाँद हे देखील सतत गैरहजर राहत असल्याने अधीक्षकांनी दोघांची चौकशी करुन त्यांनाही पोलिस सेवेतून कमी केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...