आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे पोलिस मुख्यालयातील पोलिसाचा खून: पोलिस फरार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे पोलिस मुख्यालयातील कर्मचारी रूपेश अहिरे खूनप्रकरणी म्हसावद पोलिसांनी रविवारी धुळे गाठून चौकशी केली. तसेच संशयित आरोपी अभय गवते याचा शोध घेतला. सायंकाळी उशिरा पोलिसांचे पथक पुन्हा शहाद्याकडे रवाना झाले.
पोलिस मुख्यालयातील रूपेश सुभाष अहिरे त्याचा पोलिस मित्र अभय गवते आणि प्रवीण गिते हे कारने दि. 31 डिसेंबर रोजी तोरणमाळ येथे गेले होते. याठिकाणी अभय आणि त्याचा मामा प्रवीण यांनी रूपेशला सीताखाई दरीत लोटून खून केला होता. यानंतर दोघांनी पळ काढला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरीतून रूपेशचा मृतदेह दि.2 रोजी बाहेर काढण्यात आला होता. दरम्यानच्या काळात संशयित आरोपी अभय हा प्रकृती कारणास्तव रुग्णालयात दाखल झाला होता. तर रूपेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर अभय आणि प्रवीणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर प्रवीणला अटक करण्यात आली होती. तर प्रकृतीचे कारण पुढे करून अभय खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक रमेश साळवे रविवारी दुपारी धुळ्यात दाखल झाले. त्यांनी काही ठिकाणी चौकशी देखील केली. तसेच पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांची मदत घेत काही ठिकाणी भेट ही दिली. दरम्यान, हे पथक अभयला अटक करण्यासाठी आले होते. चौकशी आणि तपासासोबतच अभयला हे पथक अटक करणार होते; परंतु पोलिसांना तो मिळून आला नाही.
यामुळे म्हसावद पोलिसांच्या या पथकाने काहींची चौकशी केली. पोलिसांचा सुगावा लागल्यामुळे अभयने पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सायंकाळी उशिरा हे पथक रवाना झाले. याबाबत उपनिरीक्षक साळवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
* अभयकडून प्रकृतीचे कारण सांगण्यात येत आहे. जगाच्या दृष्टीने तो रुग्णालयात असला तरी आमच्या रेकॉर्डवर मात्र फरार आहे. याबाबत आता केवळ कायदेशीर घोषणा तेवढी राहिली. त्याचा शोध घेऊन लवकरच अटक करू. त्यासाठी परगावीही शोध सुरू आहे. - सुनील बच्छाव, पोलिस निरीक्षक, म्हसावद पोलिस ठाणे