आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन चोर्‍यांची एकच तक्रार, पोलिसांची लढवली अजब शक्‍कल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- गुन्हा दाखल न करता ‘समेट’ घडवून प्रकरण ‘रफादफा’ करण्यात हातखंडा असलेल्या देवपूर पोलिसांनी शुक्रवारी नामी ‘शक्कल’ लढवली. दुरान्वये संबंध नसलेल्या तीन वसाहतींमधील चोरीच्या घटनांना एकत्र दाखल करून पोलिसांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, साक्री रोडवरील घटनेत 50 हजारांचा ऐवज चोरीस गेला.

एसटी कॉलनीतील प्लॉट नं.4 या ठिकाणी विनोद भवरलाल छाजेड (वय 45) हे राहतात. त्यांचा खानावळचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरातून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला, तर जवळच असलेल्या भोई सोसायटीतील सागर शंभू वाडिले यांची मोटारसायकल (क्र.एमएच-18/1555) चोरट्यांनी लंपास केली. याशिवाय देवपूर पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या खाटीकवाडा वसाहतीमधील हिराबाई किसन परदेशी यांच्या घरातून सुमारे 10 हजारांची रोकड लंपास करण्यात आली. या तिन्ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्या. त्यापैकी एसटी कॉलनी व भोई सोसायटी दत्त मंदिर परिसरात मोडते, तर खाटीकवाडा परिसर त्यापासून किमान दोन ते अडीच किमी अंतरावर आहे. असे असताना देवपूर पोलिसांनी या तिन्ही घटनांचा केवळ एकच गुन्हा दाखल केला आहे. तसेच विनोद छाजेड यांना तक्रारदार करून उर्वरित दोन्ही गुन्हे त्यातच समाविष्ट करण्यात आले आहेत. देवपूर पोलिस एवढय़ावरच थांबले नसून, तिघा चोर्‍यांमध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत फक्त 40 हजार रुपये आकारली आहे.

काय गेले चोरीस ?
या तिन्ही चोर्‍यांमध्ये रोख रक्कम, मोटारसायकल, चांदीचे दागिने व तीन मोबाइल चोरीस गेले. त्यापैकी र्शीमती परदेशी यांच्या घरातून 10 हजार चोरीस गेल्याचे दस्तूरखुद्द पोलिस सांगतात. तथापि, उर्वरित दोघांकडून काय चोरीस गेले ? याबाबत मात्र पोलिस सांगत नाहीत. दाखल गुन्हय़ांची यादी मोठी होऊ नये व चोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालाचा आकडा वाढू नये याकरिता देवपूर पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे केवळ एकमात्र गुन्हा दाखल करून त्याची किंमतही कमी आकारण्यात आली आहे.

50 हजारांची चोरी..
साक्री रोडवरील मच्छीबाजार परिसरातील बिपिन रमेश भारती (34) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचा ऐवज लंपास केला. भारती यांच्या भगिनी ज्योती गिरी या गावी गेल्या असल्यामुळे भारती कुटुंबीय र्शीमती गिरी यांच्या जवळच असलेल्या महात्माजीनगरात मुक्कामी गेले असताना ही घटना घडली. तसेच गुरुनानक सोसायटीत घडलेल्या एका घटनेत रजनी धीरज गुंडियाल (वय 31) यांच्या गळय़ातील 20 हजारांची सोनपोत ओढून दोघांनी पलायन केले. र्शीमती गुंडियाल घरी असताना दोघे लुटारू पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आले होते. त्यानंतर दोघे दुचाकीवरून पसार झाले. धुळे शहर पोलिसांत दोन्ही घटनांबाबत गुन्हा दाखल झाला आहे.