आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मनपा निवडणूक बंदोबस्तात पोलिस प्रशासन उत्तीर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. शहरातील गेल्या निवडणुकींचा इतिहास लक्षात घेता यंदा पोलिस प्रशासनाचा दबदबा उमेदवार, कार्यकर्त्यांवर दिसून आला. किरकोळ अपवाद वगळता विशेष म्हणजे यंदा मेहरूण, तांबापुरा भागात निवडणुकीच्या कारणावरून गोंधळ उडाला नाही. त्यामुळे निवडणूक बंदोबस्तात पोलिस प्रशासन उत्तीर्ण झाल्याचे बोलले जात आहे.

घरकुल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक परिणामकारक ठरणार होती. राजकीय वर्चस्वापोटी एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या नेत्यांकडून अशांतता पसरवली जाईल, असे चित्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तयार झाले होते. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा मोठा प्रo्न पोलिस प्रशासनासमोर उभा होता. गुन्हेगार प्रवृत्तींच्या लोकांना रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. नियोजनबद्ध बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी वचक निर्माण केला.

पोलिस अधीक्षक एस.जयकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव, वाय.डी.पाटील यांनी निवडणूक काळात मध्यरात्रीपर्यंत संवेदनशील केंद्रात पेट्रोलिंग केले. अतिरिक्त पोलिस कर्मचार्‍यांचा योग्य उपयोग करून घेत पोलिसांनी निवडणूक काळात अप्रिय घटनांवर अंकुश बसवला.


कारवाईचा फरक पडला
निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. तर इतरांची ‘फाईल’ तयार ठेवली होती. त्यामुळे अनेकांनी निवडणुकीत शांत बसणे पसंत केले. सुमारे 100 पेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळेही पोलिसांचा वचक कायम होता.

या घटनांमुळे अशांतता झाली पण
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटाच्या नऊ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. जामिनानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मतदानाच्या दिवशी मनसे आणि खान्देश विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली. पोलिसांनी मध्यस्थी करीत या वादाला टोकापर्यंत पोहचू दिले नाही.

मेहरूणमध्ये शांतता ठेवण्यात पोलिस यशस्वी
मेहरूण, तांबापुरा भागात राजकीय वर्चस्वासह जातीय दंगलींचा इतिहास आहे. या ठिकाणी निवडणुकीत गोंधळ होणारच असे चित्र प्रत्येक वेळी असते. शक्यता लक्षात घेता यंदा पोलिस प्रशासनाने या भागात रात्रीच्या गस्ती वाढविल्या, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आरसीपीच्या दोन विशेष तुकड्या तैनात केल्या. स्थानिक राजकारण्यांना विश्वासात घेऊन त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अखेर या भागात निवडणूक शांततेत पार पडली.