आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहरातील पोलिस चौक्यांना वाली कोण?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता यावे, नागरिकांना भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी पोलिस चौक्यांची निर्मिती केली आहे ; परंतु शहरातील केवळ बोटावर मोजण्याइतपत पोलिस चौक्या सोडल्या तर इतर चौक्यांमध्ये पोलिसांऐवजी केवळ फर्निचर आणि साहित्य असल्याचे चित्र आहे. काही चौक्यांना तर अक्षरश: कु लूप ठोकण्यात आल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. त्यामुळे पोलिस चौक्या असून नसून सारख्याच आहेत.
शहराचा चौफेर विस्तार होत असल्याने चोरीसह इतर विविध गुन्हे वाढले आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे धुळे शहरातील विविध भागांत आझादनगर व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 10 पोलिस चौक्या उभारल्या आहेत; परंतु पोलिस चौक्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. पोलिस चौक्यांमध्ये अनेकवेळा कर्मचारी उपलब्ध नसल्याने तेथे तक्रार देण्यासाठी जाणा-या नागरिकांची गैरसोय होत आहे. काही चौक्यांवर पोलिस कर्मचारी केवळ ‘हजेरी’ लावून बिनधास्त निघून जातात असे नागरिकांनी सांगितले. रामभरोसे चालणा-या या कारभाराकडे वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे दुर्लक्ष होत आहे. शहराव्यतिरिक्त धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेर, शिरूड, आर्वी, मुकटी तसेच लळिंग घाटात पोलिस चौकी आहे.
पीएसआयची कमतरता - या पोलिस चौक्यांवर किमान उपनिरीक्षक अर्थात पीएसआय दर्जाचा अधिकारी बंदोबस्ताला असला पाहिजे. तथापि जिल्हा पोलिस दलात उपनिरीक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी सहायक उपनिरीक्षक अथवा हेडकॉन्स्टेबल दर्जाचा कर्मचारी प्रशासनातर्फे बंदोबस्तावर तैनात असतात.
चौक्यांचा वचक झाला कमी - पोलिस चौक्यांमध्ये पोलिस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पोलिस चौक्यांचा वचक कमी झाला आहे. त्यामुळे पोलिस चौक्यांच्या परिसरात काही ठिकाणी अवैध व्यवसाय चालकांचे चांगलेच फावते आहे. दरम्यान, शहरातील देवपूर आणि पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौकी कार्यान्वित झालेली नसून भौगोलिकदृष्ट्या काही क्षेत्राचा कारभार हेडकॉन्स्टेबल दर्जाच्या कर्मचा-यांकडे सोपविला आहे. कामकाजातील सोयीकरीता असे करण्यात आले आहे. त्यासाठी वरिष्ठांची परवानगीदेखील घेण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली.
पोलिस चौकी आणि बंदोबस्त - आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच चौक्यांमध्ये प्रत्येकी सात कर्मचारी आहेत. शहर पोलिसांच्या हद्दीतील तीन सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी चार चौक्यांचे काम पाहतात. या चौक्यांमध्ये प्रत्येकी 12 कर्मचा-यांची नियुक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या चौक्या निर्मनुष्य - शहरातील पोलिस चौक्यांच्या स्थितीची ‘ दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने पाहणी केली. या पाहणीत आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मच्छीबाजार चौकी, पारोळा रोड चौकी, नव्यानेच कार्यान्वित झालेली जुने धुळयातील पोलिस चौकी, घड्याळवाली मशीद परिसरातील पारधी पिकेट चौकीत एकही कर्मचारी आढळून आला नाही. हीच अवस्था धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुमारनगर, चावडीवरील शहर पोलिस चौकीची आढळून आली. केवळ साक्रीरोड परिसरातील मोगलाई पोलिस चौकीत एक कर्मचारी आढळून आला.
चौकशीनंतर कारवाई करू - शहरातील सर्व पोलिस चौक्यांसाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पोलिस चौकीवर 24 तास पोलिस कर्मचा-यांनी राहणे आवश्यक आहे. असे असूनही गैरहजर राहणा-या पोलिसांविषयी संबंधित पोलिस ठाण्याचे जबाबदार अधिका-यांना विचारणा केली जाईल. पोलिस चौकीऐवजी या कर्मचा-यांना कोणत्या ठिकाणी बंदोबस्तावर पाठविले होते. याविषयी विचारणा होईल. चौकशीत तथ्य आढळल्यास अशा कर्मचा-यांवर कारवाई होईल. - प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक