Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | police stoped march in jalgaon

कानळद्यात मोर्चा रोखल्याने पोलिसांची कॉलर धरली; व्हॅन उलटवण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 09:38 AM IST

नातवाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वृद्ध दांपत्यासह नागरिकांनी सोमवारी सकाळी ११.१५ वाजता कानळद्यातू

 • police stoped march in jalgaon
  मोर्चेकऱ्यांशी संवाद साधताना उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी. सपकाळे यांचे डोके फुटल्यामुळे त्यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर रक्ताचे डाग होते.
  जळगाव- नातवाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वृद्ध दांपत्यासह नागरिकांनी सोमवारी सकाळी ११.१५ वाजता कानळद्यातून काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला. यामुळे संतप्त जमावाने पोलिसांची व्हॅन पलटी करण्याचा प्रयत्न करून एका अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच त्यांची कापडी शोल्डर प्लेटही फाडली. यात वृद्धाचे डोके फुटले. पोलिसांनी काठी मारून डोके फोडल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे गावात अडीच तास तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या सहा जणांवर तर वृद्ध रामचंद्र सपकाळे यांनी नातवाच्या मृत्यू प्रकरणातील आठ संशयिंताच्या विरूद्ध असे वेगवेगळे दोन गुन्हे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

  कानळदा येथे मरिआईच्या यात्रेनिमित्त ऑगस्ट २०१७ रोजी आयोजित तमाशा बघण्यासाठी प्रशांत श्यामकिरण सपकाळे (वय १९) गेला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या बाहेर लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. जमिनीच्या वादातून त्यांच्या चुलत्यांनी खून केल्याचा आरोप प्रशांतचे आजोबा रामचंद्र देवचंद सपकाळे यांनी केला हाेता. संशयितांना अटक होऊन शिक्षा व्हावी, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, प्रशांतचा मृत्यू गळफासानेच झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आला अाहे; परंतु हा अहवाल अमान्य करीत मारेकऱ्यांनी डाॅक्टर, पोलिसांना हाताशी धरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे. यामुळे सपकाळे दांपत्यासह सुमारे १०० गावकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

  याच वेळी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी असल्यामुळे तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, बी. डी. पाटील राजेंद्र बोरसे हे पोलिस व्हॅनने कुंवारखेडा येथे जात होते. त्यांनी कानळदा गावात गर्दी पाहून हस्तक्षेप केला. यामुळे मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवरच संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. संतप्त जमावामुळे पोलिस कुमक कमी पडली. सपकाळे यांनी पोलिस व्हॅनसमोर झोपून आंदोलन सुरू केले. मोर्चा काढू द्या, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी विरोध करताच मोर्चेकऱ्यांनी धक्काबुुक्की करीत त्यांच्या गणवेशाचे शोल्डर फाडले. व्हॅन पलटी करून देण्याचा प्रयत्न केला. गावातीलच काही तरुणांनी संतप्त मोर्चेकऱ्यांना नियंत्रणात अाणले. तोपर्यंत पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह क्यूआरटी, एआरटीचे पथक कानळद्यात दाखल झाले होते. पोलिस कर्मचारी राजेंद्र बोरसे यांनी काठी मारून डोके फोडल्याचा आरोप सपकाळे यांनी केला. तर सपकाळे यांनी स्वत: दगड मारून घेत डोके फोडून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. सांगळे आल्यानंतर सपकाळे यांनी मोर्चा काढू देण्याची विनंती केली; परंतु आचारसंहितेमुळे मोर्चा काढणे बेकायदा असल्याचे त्यांनी समजावले. दरम्यान, डोके फुटल्यामुळे सपकाळे यांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

  एकीकडे गुलाल, दुसरीकडे रक्त
  ग्रा.पं.निवडणूक निकालामुळे सोमवारी कानळद्याच्या आजूबाजूच्या गावात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू होता. गोंधळ सुरू असताना दुचाकी, चारचाकीतून गुलालाने माखलेले कार्यकर्ते ये-जा करीत होते. तर दुसरीकडे सपकाळे यांचे डोके फुटल्यामुळे त्यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर रक्ताचे डाग होते.

  रात्री उशिरा दिली फिर्याद
  सपकाळे यांनी मोर्चासंदर्भात केवळ निवेदन दिले होते. त्यांना मोर्चासाठी परवानगी मिळालेली नव्हती. दुसरीकडे पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर पोलिस, मोर्चेकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिस उपअधीक्षक सांगळे आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सपकाळेंसह सर्वांचे म्हणने ऐकून घेतले. मोर्चा का राेखला? याचा जबाब सपकाळे वारंवार विचारत होते. अखेर पोलिसांनी गर्दी पांगवून हा गोंधळ मिटवला. सुमारे अडीच तासांनंतर कोणताही पर्याय निघाल्याने संताप, चर्चा, मोर्चा अन् धक्काबुक्की हे सारं काही निष्फळ ठरले होते; परंतु रात्री उशिरा सपकाळे यांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुंडलीक बाविस्कर, राजाराम बाविस्कर, संतोष सपकाळे, भूषण सपकाळे, प्रकाश अहिरे, मच्छू सपकाळे, संजय सपकाळे राजू सपकाळे या आठ जणांच्या विरूद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिसांच्या कामात अडथळा आणून दंगल केल्याप्रकरणी रामचंद्र सपकाळे, त्यांच्या पत्नी, ज्ञानेश्वर कंखरे, संदीप सपकाळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 • police stoped march in jalgaon
  नातू प्रशांतचा फोटो पाहून भावुक झालेली त्याची आजी.

Trending