आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Support Criminal Santosh Patil In Jalgaon

सट्टाकिंग संतोष पाटीलची गुंडागर्दी पोलिसांच्या आशीर्वादानेच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बालाजी पेठसारख्या अत्यंत धार्मिक वातावरण असलेल्या भागात दोन दिवसांपूर्वी तलवारी नाचवत सर्वसामान्यांच्या घरात घुसून मारहाणीची मजल गाठणा-या संतोष पाटीलची गुंडागर्दी पोलिसांच्या आशीर्वादानेच दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी सामान्य कार्यकर्ता असलेला संतोष आज सट्टाकिंग म्हणून नावाजला आहे. जुगारातील पैशांच्या जोरावर त्याने शनिपेठ, शहर पोलिसांसह विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही खिशात घातले आहे. इशू सिंधू यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी शहरात असताना पोलिस दलातीलच काही कर्मचा-यांच्या सहकार्याने फोफावणारी गुंडागर्दी चिंताजनक होत चालली आहे.
बालाजी पेठ हा भाग जळगावातील जुने गाव म्हणून ओळखला जातो. पूर्वी अत्यंत शांत असणारा हा भाग आता मात्र शहरातील सर्वाधिक संवेदनशील भागात मोडला जातो. पूर्वीपासूनच नेतेगिरीची हौस असलेला संतोष पाटील हा याच भागातील रहिवासी आहे. संतोष एका नगरसेवकाच्या मदतीने पाच, पन्नास कार्यकर्ते सोबत घेऊन आंदोलने करू लागला. परिसरात लोकांच्या कोणत्याही कार्यात धावून जाणारा संतोषने अल्पावधीतच लोकांना आपलेसे केले. त्याच्या अवतीभवती दिवसभर 50 ते 60 कार्यकर्त्यांचा गराडा राहू लागला. मग त्याला गुर्मी चढली. छावा संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करीत तो नागरिकांबरोबरच पोलिसांनाही वेठीस धरू लागला. बघता बघता तो पोलिसांचा ‘भाऊ’ झाला. पोलिसांवर विशिष्ट प्रकारचा प्रभाव निर्माण करून संतोष लोकांना धमकावत असे. या प्रकरणात काही पोलिस कर्मचारीच त्याला पाठबळ देत असत. त्याने काही टपोरींना हाताशी धरून हॉटेल प्रतापच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे मालधक्क्याला लागून सट्ट्याचा धंदा सुरू केला. गेले वर्षभर त्याने या भागात सट्ट्याचा व्यवसाय सुरू करून बक्कळ पैसा कमावला. दोन नंबरने कमावलेल्या पैशामुळे त्याची गुर्मी आणखीनच वाढत गेली. त्यातच त्याला पोलिसांकडून मिळणा-या पाठबळामुळे आणखीनच माज आला. पोलिसांनी वारंवार त्याच्या रिकाम्या उद्योगाकडे दुर्लक्ष केल्याने तो पोलिसांना खिशात घेऊन फिरण्याची भाषा करू लागला.
कलम वाढविले - शनिपेठ पोलिस ठाण्यात संतोष पाटीलसह अन्य पाच जणांविरुद्ध दाखल असलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात बुधवारी पोलिसांनी गंभीर दुखापत केल्याप्रकरणी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवि कलम 307 हे वाढविले आहे. सुरुवातीला गुन्हा दाखल करताना 307 कलम लावण्यास कुचराई करणा-या पोलिसांनी वरिष्ठ अधिका-यांच्या दबावानंतर हे कलम वाढविले आहे. संतोषला फरार करण्यात शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश जाधव यांचीही भूमिका संशयास्पद मानली जात आहे.
संतोष फरार कसा? - खोंडे कुटुंबीयांवर हल्ला करून संतोष बालाजी पेठेतून फरार झाला कसा? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खोंडे कुटुंबीयांवर हल्ला झाल्यानंतर लागलीच त्यांनी शनिपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात घडलेली घटना सांगितल्यानंतर लागलीच काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. त्यावेळी संतोष हा तेथेच होता. मात्र, पोलिस ठाण्यात संतोषचे नाव खोंडे कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर संतोष फरार झाला. संतोष फरार झाला की फरार केला गेला? याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. शनिपेठ पोलिसांना तो सापडत नसेल तर या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
नगरसेवकाचा पाठिंबा - महापालिकेतील एका स्वतंत्र आघाडीचा गटनेता असलेल्या एका नगरसेवकाच्या पाठिंब्यावर संतोष या भागात दादागिरी करतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये संतोषचे कार्यकर्ते त्या नगरसेवकाचे काम करतात. त्यामुळे त्याला सर्वस्तरावर नगरसेवक पाठिंबा देत असत. या नगरसेवकाच्या पाठिंब्यावर संतोष नको ते उद्योग करू लागला. खोंडे कुटुंबीयांवर हल्ला केल्यानंतर त्याच नगरसेवकाने संतोषला लपवून ठेवल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकारामुळे परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या प्रकारावर पोलिस प्रशासनाने वचक निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संतोषवर यापूर्वी दोन गुन्हे - संतोष हा ज्या भागात राहतो त्या शनिपेठ पोलिसांच्या हद्दीत त्याच्यावर दाखल झालेला शनिपेठ पोलिस ठाण्यातील पहिलाच गुन्हा असला तरी त्याच्यावर यापूर्वी शहर पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक-एक गुन्ह्याची नोंद आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी हाणामारीप्रकरणी त्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तर तालुका पोलिस ठाण्यात त्याच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल आहे.