आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Take Action Against On Mukharjee Nagar Complex Store Keeper

मुखर्जी संकुलातील दुकानदारांवर गुन्हा दाखल; वीज पुरवठाही केले खंडित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका व डॉ. शामा प्रसाद मुखर्जी संकुलातील दुकानांच्या स्थलांतराचा वाद पोलिस ठाण्यात पोहचला आहे. बंदोबस्तासह दुकाने तोडण्यासाठी आलेल्या पालिका अधिकार्‍यांच्या कामात अडथळा आणला म्हणून 20 दुकानदारांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या 36 दुकानांची वीज कोणतीही सूचना न देता खंडित करण्यात आली आहे.

मुखर्जी उद्यानालगतच्या 48 दुकानदारांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया पालिकेने चालवली आहे. आतापर्यंत 11 दुकानदार स्थलांतरित झाले असून 36 दुकानदारांनी नकार दाखवला आहे. हा वाद न्यायालयापर्यंत पोहचला आहे. आयुक्त संजय कापडणीस यांनी 31 मे रोजी दिलेल्या आदेशानुसार पालिकेचे अधिकारी कर्मचारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलिस बंदोबस्तासह दुकाने तोडण्यासाठी दाखल झाले. दुकाने खाली करण्यासाठी पालिकेने दुकानदारांना 1 तासाची मुदत दिली. परंतु कोणीही दुकाने रिकामी केली नाही. दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता दुकानदारांकडे न्यायालयाचे स्थगिती आदेश नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. दुपारी 2 तासांच्या घडामोडीनंतर संपूर्ण पथक दुकाने न तोडताच परत गेले.

तातडीने न्यायालयात धाव
पालिकेने दुकाने तोडण्याची तयारी केल्याने काही जण तातडीने न्यायालयात गेले. त्यांनी मुख्य न्यायाधीश इंदिरा जैन यांच्याकडे अर्ज करीत स्थगिती देण्याची विनंती केली. परंतु स्थगिती कोणत्या पुराव्याने द्यावी असा मुद्दा पुढे आल्याने दुकानदार शेख सादीक अब्दुल रऊफ यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र देण्यात आले. त्यावर 6 जून रोजी सुनावणी होणार आहे.दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणला म्हणून 20 दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.


दुकानांची वीज तोडली
महापालिकेच्या पथकाने दुपारी क्रॉम्प्टनच्या मदतीने 36 दुकानांमधील वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे या दुकानांमध्ये आता वीज पुरवठा होणार नाही.