आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण: विरोधकांच्या आरोपांमुळे भाजपपुढे अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तब्बल ३५ वर्षांनंतर शहरात भाजपला आमदारकीची संधी मिळाली. राज्यातही असलेल्या सत्तेचा उपयोग शहराच्या भल्यासाठी होईल निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हायला लागेल, असे अपेक्षित असलेले चित्र अजूनही दिसत नाही. उलट भाजपचे नेते एकनाथ खडसेंचा महापालिका आयुक्तांवर दबाव असतो. त्यामुळे ते शहराच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत; घेतले तरी त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न होताे, असे चित्र आता वाढत चालले आहे. विरोधकांकडून ताकदीने होणाऱ्या आरोपांमुळे भाजपला आपला जनाधार टिकवणे अवघड जाऊ शकते.
राज्यातील सत्ता बदलानंतर पालकमंत्री तथा महसूलमंत्री एकनाथ खडेसेंचे नेतृत्व मान्य असलेले खाविअा, राष्ट्रवादी मनसेने परवाच्या बैठकीत भाजपला धोबीपछाड करण्याचा प्रयत्न केला. गाळे कारवाईत प्रशासनाची झालेली अवघड परिस्थिती पाहता खाविआने तर थेट आयुक्तांवर पालकमंत्री खडसेंचा दबाव असल्याचा आरोप केला. अशा पद्धतीचे आरोप आतापर्यंत उघडपणे केला जात नव्हता. मनपात सत्तेत असलेल्या खाविआला दोन वर्षांपूर्वी याच जळगावकरांनी मतांचा कौल दिला होता. आता त्यांच्या हातून आमदारकी गेली आहे, त्यामुळे खाविआला नाही म्हटला तरी शहरात जनाधार आहेच. पाच हजार गाळेधारकांसाठी पाच लाख जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप खाविआ करू लागली आहे. त्यामुळे त्यांना सहाजिकच जनतेचे पाठबळ मिळू शकते. कारण जनताही पार वैतागली आहे. त्यात अशा पद्धतीच्या आरोपांमुळे गाळ्यांचा मुद्दा असाच लांबत राहिला तर जनता भाजपवरील दबावतंत्राच्या आरोपावर विश्वास व्यक्त करू शकते.
दबावतंत्राचा पहिल्यांदाच उल्लेख
आयुक्त संजय कापडणीस यांना जळगाव मनपात नियुक्ती देण्यासाठी खडसेंची शिफारस होती. त्यामुळे आयुक्त खडसे यांचे संबंध चांगले आहेत हे सर्वश्रुत आहेच. राज्यातील सत्ताबदलानंतर खडसेंकडे दोन नंबरचे मंत्रिपद आले. त्याचा फायदा शहराला होईल, अशी आशा असताना खडसे मात्र आयुक्तांवर दबाव आणून अपेक्षित निर्णय लागू करतात, असा आरोप पहिल्यांदाच जाहीररीत्या करण्यात आला. हे आरोप आयुक्तांनी नाकारले असले तरी हा विषय आता शहरातील चर्चेचा विषय ठरत आहे. खडसेंच्या दबावामुळे विकासाला खीळ बसतेय हा समज जर नागरिकांच्या मनात पक्का झाला तर आगामी काळात भाजपला आपला जनाधार टिकवणे कठीण जाऊ शकते.
पालकमंत्री खडसेंकडून प्रचंड अपेक्षा
विधानसभेत उमेदवार सुरेश भोळे असले तरी पालकमंत्री खडसेंकडे पाहून अनेकांनी मतदान केले. त्यामुळे खडसेंकडून शहराला प्रचंड अपेक्षा आहेत; परंतु भाजप खाविआ यांच्यातील शीतयुद्ध संपायला तयार नसून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर होतोय. मनपा कर्जमुक्त करण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र गाळ्यांचा प्रश्न जितका जास्त लांबवता येईल तेवढा लांबवा, असाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय. आयुक्तांनी दोन वर्षांच्या प्रक्रियेनंतर कायदेशीररीत्या गाळे सील करून ताब्यात घेतली; मात्र आता तेच गाळे पुन्हा व्यापाऱ्यांना देण्यासाठी खडसे पत्रव्यवहार करत आहेत. जर शासनाने गाळ्यांचे सील उघडले तर गाळे करार अथवा लिलावाचा विषय लांबण्याची भीती व्यक्त होतेय.
बातम्या आणखी आहेत...