आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Importance Of Anil Chodhri, Divya Marathi

मतभिन्नतेमुळे वाढले अनिल चौधरींचे महत्त्व!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे स्थानिक नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याने रविवारी राजीनामा नाट्याचा पहिला अंक घडला. या राजीनामा नाट्यामुळे चौधरींचे महत्त्वही नको तेवढे वाढले आहे.
खडसेंचा विश्वासघात करून चौधरींच्या प्रवेशाचे षड्यंत्र आखले जात आहे, ही कुणकुण भुसावळच्या भाजपेयींना लागली तेव्हापासून हा विषय खर्‍या अर्थाने पेटला. चौधरींच्या पक्षप्रवेशाला विरोध करणार्‍यांची धार तीव्र झाली असली तरी ती आता चौधरींच्या पथ्यावरच पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ‘माझ्या भाजप प्रवेशामुळे जर दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद होत असतील तर प्रवेश करणार नाही. मतभेद संपल्यावरच प्रवेशाचा विचार आहे’, अशी भावना अनिल चौधरींनी भाजपातील राजीनामा नाट्यानंतर प्रसार माध्यमांकडे व्यक्त केली आहे. त्यांची ही भावना चिकित्सकपणे अभ्यासली तर ते आता बॅकफूटवर येण्याची शक्यता वाढली आहे. तसे झालेच तर भाजपमध्ये गृहकलहाची बीजं रोवण्यात ते यशस्वी झाले आहेत, असा अर्थ कोणी काढला तर त्यात गैर तरी काय?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच चौधरींनी भाजपचा दरवाजा ठोठावून पद्धतशीरपणे आपलं महत्त्व वाढवून घेतलं आहे. खरं सांगायचं झालं तर त्यांचा दखलपात्र प्रभाव हा फक्त भुसावळ शहरापुरताच र्मयादित आहे. ही वस्तुस्थिती असतानाही एकनाथ खडसे यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याने अनिल चौधरींचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळेच खर्‍या अर्थाने चौधरींचे महत्त्व वाढले आहे. कदाचित अनिल चौधरींसोबत भुसावळातून किती विद्यमान, माजी नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी येणार आहेत? याची पडताळणी केली असती तर भाजपात गृहकलह आता जसा समोर आला, तसा तो आला नसता.
चौधरींनी भाजपचा दरवाजा का ठोठावला?
- राष्ट्रवादीत असताना तन-मन-धन अर्पण करून पक्षाचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने दोन वर्षे हद्दपार राहावे लागले. या कालखंडात पक्षाने मदत केली नाही, हे शल्य बोचत असावे.
- पालकमंत्री संजय सावकारे यांनी अडचणीच्या काळात अपेक्षित मदत केली नाही म्हणून भविष्यात त्यांना धडा शिकवता यावा, यासाठी त्यांच्याशी लढत देणार्‍या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजप प्रवेशाचा विचार केलेला दिसतो.
-राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी हे नगराध्यक्षपदाची अभिलाषा बाळगून आहेत. ते भाजप, खाविआशी असलेल्या मैत्रीचे संबंध वापरून इच्छा पूर्ण करू शकतात. तत्पूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश केला तर लोणारींचा स्वप्नभंग करता येईल.
-राष्ट्रवादीत राहून कितीही काम केले तरी कार्यकर्ते संतोष चौधरींनाच नेता मानतात. पक्षांतर केले तर नवीन राजकीय संस्थान निर्माण करून ‘नेता’ बनण्याची संधी मिळू शकते.