आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Internal Groupism Issue At Bhusawal Bjp, Divya Marathi

अनिल चौधरींच्या प्रवेशावरून भुसावळ भाजपमध्ये चलबिचल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल यांच्या पक्षप्रवेशाला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंसह भुसावळ भाजपमधून जोरदार विरोध उफाळला होता. या गोष्टीला पंधरवडा होत नाही, तोच स्वत: खडसेंनी चौधरींच्या प्रवेशाचे संकेत दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची अवस्था ‘सहनही होईना अन् सांगताही येईना’, अशी झाली आहे.
लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींच्या भाजप प्रवेशाचा विषय प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पुढे आला होता. मुंबईत पक्षप्रवेश होईल, अशी भनक लागताच भुसावळमधील भाजपचे 10 नगरसेवक आणि काही पदाधिकार्‍यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे पाठवून विरोध दर्शवला. मुक्ताईनगर गाठून विरोधी पक्षनेते खडसेंकडे चौधरींना प्रवेश नको, अशी भूमिका घेत. या राजीनामा नाट्यापूर्वी खडसे यांनी चौधरींचा प्रवेश स्वत: थांबवल्याचे जाहीर करत कार्यकर्त्यांच्या संमतीशिवाय काहीही होणार नाही, असे स्पष्ट केले होते. या मुळे पक्षात ठरवून होऊ पाहणारे बंड शमले होते. मात्र, आता दोन दिवसांपूर्वीच्या जामनेर भेटीत खडसे यांनीच अनिल चौधरींच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले. अशी भूमिका घेण्यामागे नेमक्या काय घडामोडी झाल्या? असे प्रश्न उमटणे सुरू झाले आहेत.
संघर्षाला पूर्णविराम?
भुसावळात राष्ट्रवादीचे नेतृत्व चौधरी बंधू तर सेना-भाजपचे नेतृत्व प्रामुख्याने लेवा पाटील समाजातून पुढे आलेल्यांच्या हातात एकवटले आहे. गेल्या दोन दशकांपासून या दिग्गज प्रतिस्पध्र्यांमधील कडवा राजकीय संघर्ष चौधरींच्या प्रवेशाने इतिहासजमा होतो? की भाजपचे कार्यकर्ते विरोधावर ठाम राहतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.