आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Magic Figure Issue At Bhusawal, Divya Marathi

भुसावळात मॅजिक फिगरसाठी ‘डिनर डिप्लोमसी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- नगराध्यक्ष उमेश नेमाडेंचा कार्यकाळ जून महिन्यात संपणार आहे. या पदावर वर्णी लागण्यासाठी सध्या राजकीय खलबते सुरू आहेत. नगरसेवकांना खूश करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून ‘डिनर डिप्लोमसी’चा मार्ग अवलंबला जात आहे. सिंधी कॉलनी, चोरवडचा ढाबा आणि गुप्त ठिकाणी सध्या रात्री उशिरापर्यंत मॅजिक फिगर गाठण्यासाठी आखाडे बांधले जात आहेत.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतील दोन्ही गट, भाजप आणि खान्देश विकास आघाडी सज्ज झाली आहे. पालकमंत्री संजय सावकारे गटाकडून युवराज लोणारी यांचे नाव पुढे येत असून भाजप आणि खाविआचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. सिंधी कॉलनीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या डिनर डिप्लोमसीत 20 नगरसेवकांची हजेरी होती तर दोन जण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटानेही चोरवड येथे स्नेहभोजन घडवून आणले. त्या ठिकाणीही 20 ते 22 नगरसेवक उपस्थित होते. बहुमतासाठी 24 ची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. संतोष चौधरी यांनी यापूर्वीच नगराध्यक्षपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठीचे आश्वासन दिले आहे. या मुळे मुस्लिम समाजातून कोणाचे नाव मात्र जाहीरपणे पुढे आलेले नाही. अंतर्गत हालचाली वेगवान पद्धतीने होत असल्याचे पाहून भाजपच्या एका नगरसेवकाने मुंबईत पलायन केले आहे. येत्या आठवड्यात किंवा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगरसेवकांच्या सहलीचेही नियोजन सुरू आहे. शेवटी घोडेबाजार कसा रंगतो? यावर भविष्यातील राजकारण अवलंबून आहे.
चर्चेतील नावे अशी
पालकमंत्री संजय सावकारेंच्या गटाने मॅजिक फिगर गाठली तर युवराज लोणारी यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे शहराध्यक्ष रमण भोळे यांच्या नावाची चर्चा आहे. माजी आमदार संतोष चौधरींच्या गटाने बाजी मारल्यास नगराध्यक्षपदी अख्तर पिंजारी किंवा तर्रन्नूम इद्रिस यांच्या नावाची चर्चा आहे. उपनगराध्यक्षपदी विजय चौधरींना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
अपक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची
युवराज लोणारी यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीचे पालकमंत्र्यांच्या गटातील नगरसेवक आणि खाविआच्या नगरसेवकांची जमवाजमव करावी लागेल. तर दुसरीकडे संतोष चौधरींकडे हक्काचे 22 नगरसेवक तयार असल्याचा दावा केला जात आहे. मॅजिक फिगरसाठी अपक्षांची भूमिका, खाविआचा व्हीप, गटनेत्यांची भूमिका या सर्व बाबी महत्त्वपूर्ण असतील.