आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Suresh Jain Meat To Sharad Pawar, Divya Marathi

आमदार सुरेश जैन यांची राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांना भेटण्‍याची लगीणघाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यापूर्वी काही विषयांवर भूमिका निश्चितीसाठी खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन आपल्या शिलेदारांसोबत राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीसाठी पुणे येथे पोहोचले आहेत. शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा पूर्ण झाली आहे. शनिवारी शरद पवारांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकसभेच्या दृष्टीने जळगाव शहरातील निर्णायक मतांचा आकडा वळवू शकणार्‍या खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रयत्‍न सुरू होते. आमदार सुरेश जैन यांना अडचणीतून बाहेर काढणे, शहराच्या केंद्रात अडकलेल्या मोठय़ा योजना मार्गी लावणे, या अटींची पुर्तता करणार्‍यांना पाठिंबा देणार असल्याचे खान्देश विकास आघाडीतर्फे सांगण्यात आले होते. मतदान दोन आठवड्यांवर आलेले असतानाही आघाडीच्या अटी पूर्ण करण्यासंदर्भात ठोस उत्तर मिळालेले नसावे की काय म्हणून अद्यापही पाठिंबा जाहीर केलेला नाही.

शेवटचा प्रयत्‍न म्हणून अजून काही पदरात पाडून घेण्यासाठी खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन काही मोजक्या मंडळींसह पुण्याला गेले होते.आघाडीच्या मंडळींना उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चेसाठी सायंकाळी 7 वाजेची वेळ देण्यात आली होती. याच बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव वाणी यांनाही बोलवून घेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत ही बैठक घडवून आणण्यात आली. अजित पवार, वसंत वाणी व रमेश जैन यांची बराच वेळ चर्चा झाली. शनिवारी पुन्हा शरद पवारांसोबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. चर्चेत काय ठरते, यासंदर्भात शनिवारी सायंकाळी माहिती देणार असल्याचे राष्ट्रवादीचे वसंत वाणी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.