आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणापेक्षा एकत्र येऊन विकास साधण्याचा उमटला सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; पक्षीयराजकारणात अधोगतीला गेलेल्या महापालिकेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आता सर्व पक्षांतील तरुण नगरसेवकांनी एकीची मोट बांधायला सुरुवात केली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेल्या बैठकांपाठोपाठ गणेशोत्सवानिमित्ताने झालेला चहापानाचा कार्यक्रम त्याचेच संकेत मानले जात आहेत. आता राजकारणापेक्षा एकत्र येऊन विकास साधला जावा, असा सूर व्यक्त केला जात असून जिल्ह्यातील इतर निवडणुकांप्रमाणेच महापालिकेतही सर्वपक्षीय राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत.
खान्देश विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी, अशा चार पक्षांच्या राजकारणाचे कुंपण असलेल्या महापालिकेत गेल्या दशकात शहरात विकासाची काम हाेऊ शकलेली नाहीत. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधाही देणे कठीण झाले आहे. त्यात आतापर्यंत राज्य सरकारकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे पालिकेची प्रचंड कोंडी झाली. महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटली. परंतु, जळगावकरांना अपेक्षित न्याय देता आला नसल्याच्या भावना सर्वच पक्षांतील नगरसेवक व्यक्त करतात. राज्यात पूर्ण तर पालिकेत अर्धी सत्ता असतानाही भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
राजकारण केल्यास समाजकारणातून बाद हाेण्याची भीती नगरसेवकांना भासतेय. यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचा सूर व्यक्त होत आहे. त्यातूनच आमदार सुरेश भाेळे यांनी महापालिकेत सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच सर्व पक्षांचे नगरसेवक महापौर उपमहापौरांच्या दालनात एकत्र येऊन चर्चा करू लागले आहेत. शुक्रवारी सकाळी आमदार भोळेंनी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी चहा-नाश्ताचा कार्यक्रम आयोजित केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर दहा महिन्यांनी पालिकेतील लोकप्रतिनिधी एकत्रआले. हे चित्र सर्वपक्षीय राजकारणाकडे जाणारे पाहायला मिळतेय.

प्रतिष्ठा वापरून मार्ग काढा
मनपाच्या विकासासाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या गाळ्यांसंदर्भातील ठराव क्र. १३५ चा प्रश्न तातडीने साेडवावा, अशी मागणी केली. आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, त्यामुळे आपल्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती करण्यात आली. या वेळी उपमहापौर सुनील महाजन, भाजप गटनेते अश्विन सोनवणे, अमर जैन, सुनील पाटील, पृथ्वीराज सोनवणे, संतोष पाटील, नितीन बरडे, श्यामकांत सोनवणे, अतुलसिंह हाडा, विनोद देशमुख अादी उपस्थित होते.

मागाल तेवढे देण्याची आमदारांची तयारी
गणेशोत्सवानिमित्तानेएकत्र आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता आमदार भाेळेंच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी नगरसेवकांचे आदरतिथ्य करत मिसळ, चहाचा पाहुणचार झाला. महापालिकेच्या गणेश मंडळांसाठी मागाल तेवढी वर्गणी देण्याची तयारी आमदार भाेळेंनी दाखवली. मात्र, सर्वसंमतीने ५१ हजार घेण्यात आले.

आगामी निवडणुकीवरही प्रभाव शक्य
इतरनिवडणुकांप्रमाणेच आता महापालिकेतील स्थायी समिती सभापती असो की महापौर निवड यातही भविष्यात सर्वपक्षीय निवडणुकीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्ष एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात अाहे.