आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँलम, ब्लिचिंग पावडर गुणवत्तेची होणार तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तज्ज्ञांनी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या अँलम आणि ब्लिचिंग पावडरच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला होता. तसेच त्यांच्या दर्जाची तपासणी करून योग्य मात्रा ठरवण्याकडेही लक्ष वेधले होते. त्यानुसार बुधवारी जिल्हा प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी वाघूर व उमाळा जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्याचा अहवाल आठवडाभरानंतर प्राप्त होणार आहे.

पिवळ्या पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पालिकेकडून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जिल्हा प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. विद्यापीठातील सूक्ष्मजीव व पर्यावरण विभागातील डॉ.तेजोमयी भालेराव यांनी काही दिवसांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या रासायनिक घटकांचा (ब्लिचिंग पावडर, अँलम) दर्जा तपासून पाहणे व त्यांच्या शुद्धतेची खात्री करून घेण्याकडे लक्ष वेधले होते. तसेच दर्जा तपासणीनंतरच वापराची मात्रा ठरवण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

बुधवारी जिल्हा प्रयोगशाळेतील कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भेट देऊन पाहणी केली. या पथकाने धरणाच्या साठय़ातील पाणी, शेवाळ, तुरटी व ब्लिचिंग पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीनंतर आठवडाभरात त्याचा अहवाल पालिकेस देण्यात येणार आहे. या वेळी केमिस्ट दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते.