आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल-वायू प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांविरोधात कारवाई; दुर्गंधी, कुबट वासप्रकरणी प्रदूषण मंडळाची तंबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खेडी, अयोध्यानगर,कालिंकामाता मंदिर परिसर, ज्ञानदेवनगर भागातील असह्य दुर्गंधी, कुबट वासप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन कंपन्यांविरोधात कडक कारवाई केली अाहे. जल-वायू -प्रदूषण पसरवल्याबद्दल सनशाइन अॅग्रोसह तीन कंपन्यांना कडक शब्दात नोटीस बजावून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून रेमंड,मेरिको इंडस्ट्रीज,लीडस् केम,गीतांजली केमिकल,बेन्जो केम यासह २० कंपन्यांना खबरदारी घेण्याचे सूचनापत्र मंडळाने धाडले आहे. 
 
आैद्याेगिक वसाहत परिसरातील खेडी,अयोध्यानगर, ज्ञानदेवनगर भागात तसेच कालिंका माता मंदिर परिसरातील नागरिक दुर्गंधी आणि कुबट वासामुळे हैराण झाले होते. गुरुवारी रात्री या परिसरात दुर्गंधी असह्य झाल्यामुळे अनेकांना मळमळसारखा त्रास होत होता. गेल्या तीन दिवसांपासून या भागात तोंडाला रुमाल लावून फिरावे लागत होते. तसेच घराचे दारे-खिडक्या बंद करून बसावे लागत होते. याप्रकरणी परिसरातील नगरसेवक, सजग नागरिकांनी महापालिका आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला फोन करून माहिती दिल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री परिसराची पाहणी केली होती.
 
तसेच शुक्रवारी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात काही कंपन्यांना भेटीही दिल्या. यात काही कंपन्यांमुळे जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले.त्यानंतर शनिवारी उपप्रादेशिक नियंत्रण अधिकारी अशोक करे यांनी ही कारवाई केली. दुर्गंधीचा शाेध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाने शुक्रवारी पाहणी केली असता सिद्धार्थ कार्बाे केम, वेगा केमिकल सनशाइन अॅग्राे या तीन कंपन्यांच्या परिसरात जल वायू प्रदूषण हाेत असलेले अाढळून अाले. त्यांना हाेणारे जलप्रदूषण त्वरित बंद करून त्याबाबत उपाययाेजना करण्याची तंबी मंडळाने दिली आहे. 
 
२० कंपन्यांनाही सूचना पत्र 
दुर्गंधी प्रदूषणाबद्दल तीन कंपन्यांना नाेटीस बजावण्यात अाली असून २० कंपन्यांनाही सूचना पत्र देण्यात अाले अाहे. त्यानुसार खबरदारी घेऊन उपाययाेजना केल्यास कंपनी बंद करण्यापर्यंत कडक कारवाई करण्यात येईल. 
- अशाेक करे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग 
 
शनिवारी दुर्गंधीचा त्रास नाही 
गेल्या चार दिवसांपासून दुर्गंधींच्या त्रासाने हैराण झालेल्या ज्ञानदेवनगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. शनिवारी अाैद्याेगिक वसाहतीचा सुट्टीचा दिवस असल्याने कंपन्या बंद हाेत्या. प्रदूषणाचबद्दल नागरिकांना संशय असलेली सनशाइन केमिकल कंपनीही बंद हाेती. तसेच दुर्गंधी ही पाऊस पडल्यानंतरच पसरत असल्याचा अनुभव आला होता. शनिवारी पाऊसही झाला नाही. त्यामुळे दुर्गंधी समस्या जाणवली नाही. 
 
प्रदूषण यंत्रणा सुरळीत करण्याच्या सूचना 
अाैद्याेगिकउत्पादन करीत असतांना प्रदूषण हाेऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची यंत्रणा उद्याेगात असायला हवी. ती याेग्य प्रकारे कार्यरत अाहे किंवा नाही, याबाबत खात्री करून त्यात त्रुटी असल्यास तत्काळ दूर करण्याबाबत सूचना पत्र वरील तीन कंपन्यांसह २० कंपन्यांना देण्यात अाले. यात गीतांजली केमिकल, बेंजाे केम, रेमंड, मेरिकाे इंडस्ट्रीज, स्पेक्ट्रम, समृध्दी केमिकल, सुगाेनिअर, लिड्स केम् , सुहान केमिकल अादींचा समावेश अाहे. 
 
पालिकेकडून उपाययाेजना नाही 
चार दिवस हजाराे लाेकांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागत असताना स्वच्छता अाराेग्य ही महापालिकेची जबाबदारी असूनही काेणत्याही प्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी या भागात जाऊन समस्या जाणून घेतली नाही. तसेच ती साेडवण्याच्या दृष्टीने काेणतीही उपाययाेजना केली नाही. याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी अाहे. 
 
कंपनीतून शून्य टक्के डिस्चार्ज 
नागरिकांना हाेणाऱ्या दुर्गंधीच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून पुढाकार घेऊन दीडशे कामगार असलेली कंपनी पाच दिवस बंद ठेवण्याची तयारी ठेवली अाहे. मात्र, कंपनीत प्राेटीन उत्पादन हाेते. त्यातून असह्य दुर्गंधी येत नाही. कंपनीतून काेणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा गॅस रुपाने बाहेर साेडले किंवा टाकले जात नाही. शुक्रवारी प्रदूषण विभाग मनपा अाराेग्याधिकारी नागरिक यांनी येऊन पाहणी केली ते सुध्दा दुर्गंधी कंपनीतूनच येते याबद्दल त्यांचीही खात्री झाली नाही. 
- डाॅ.डी.टी. चाैधरी, संचालक, सनशाइन अॅग्राे 
 
बातम्या आणखी आहेत...