आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आता धुळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - औद्योगिक कंपन्या आणि इतर प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणा-या महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय शहरातील देवपूर भागात काल सोमवारपासून कार्यान्वित झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन तत्कालीन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश हा जळगाव येथील विभागीय कार्यालयात होता. सन 2000मध्ये या कार्यालयाचे विभाजन होऊन जळगावसाठी स्वतंत्र आणि धुळे व नंदुरबारसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले. कार्यालय जळगाव येथे असल्याने धुळे व नंदुरबार येथील उद्योजक आणि कार्यालयातील अधिका-यांनाही कामकाजाबाबत अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्याची मागणी काही वर्षांपासून होत होती. त्यानुसार हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. कार्यालय शहरात सुरू झाल्याने औद्योगिक वसाहत, नंदुरबार जिल्ह्यातील विविध उद्योग, साखर कारखाने आदींसाठी कार्यालय सोईचे ठरणार आहे. कार्यालयामार्फत औद्योगिक क्षेत्रासह इतर ठिकाणी असलेल्या उद्योगात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांवर कारवाई केली जाते. कार्यालयामार्फत कंपन्यांना भेटी देऊन उत्पादनामुळे निर्माण होणारा घनकचरा, त्याची विल्हेवाट आदीबाबत तपासणी करणे, नुमने घेणे यासह त्यात त्रुटी आढळल्यास संबंधितांना नोटिसा बजावणे, कारवाई करणे आदी प्रकारचे कार्य केले जाते.
तेराशे उद्योगांवर नियंत्रण
येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या नियंत्रणात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील धुळे, नवापूर एमआयडीसी, साखर कारखाने, सूतगिरण्या आणि इतर ठिकाणी असलेल्या लहानमोठ्या स्वरूपाचे एक हजार 300 पेक्षा अधिक उद्योग आहेत. या उद्योगांकडून प्रदूषणाबाबतचे नियम पाळले जातात किंवा नाही याबाबत तपासणी करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या कार्यालयाकडून केले जाणार आहे.

जनजागृती करणार
या कार्यालयाकडून उद्योगांद्वारे होणा-या प्रदूषणाबाबत नियंत्रण ठेवण्याचे कार्य तर केले जाते. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाबाबत तक्रार कार्र्यालयाकडे केल्यास त्याबाबत चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई होऊ शकते; परंतु अनेकांना या कार्यालयाच्या कामकाजाबाबत माहिती नाही. त्यासाठी जनजागृती गरजेचे आहे.
बा. म. कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण मंडळ