आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापीचे प्रदूषण थांबेना, शहरासह रेल्वेच्या हद्दीतही होतो दूषित पाणीपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरालगतच्या कंडारीसह, उत्तर वॉर्ड भागातील सांडपाणी थेट तापी नदीपात्रात सोडल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे रेल्वेसह आणि शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सांडपाणी पश्चिमेकडे वळवण्याची योजना हाती घेतली होती, त्यासाठी ५८ लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाला. तत्कालीन डीआरएम महेशकुमार गुप्ता यांच्यासह विद्यमान डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी या कामाची पाहणी केली होती. तरीदेखील या कामाला अद्यापही मुहूर्त गवसत नसल्याने तापी पात्रातील जलप्रदूषणाची समस्या कायम आहे.
रेल्वे रॉ-वॉटर पंपिंग स्टेशनच्या पूर्वेकडील भागात असलेले रेल्वे उत्तर भाग, कंडारी गाव आणि इतर भागांतील सांडपाणी थेट तापी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे तापीमध्ये जलप्रदूषण वाढले आहे. सर्व सांडपाणी थेट रेल्वे आणि पालिकेच्या बंधा-यात साचते. यामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेसही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. सांडपाण्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक वेळ खाऊ होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बंधा-यात जाणारे सांडपाणी थेट पश्चिम भागाकडे वळवून ते ५५० मीटर अंतरावर सोडले जाणार आहे. यासाठी डायमीटरची पाइपलाइन टाकली जाणार होती. ५८ लाख रुपयांचा निधीदेखील या कामासाठी मंजूर झाला होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे, त्यामुळे तापीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळले जात आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे.

- आगामी काळात पाऊस वाढल्यानंतर पूर्णा नदीचा गाळ तापी नदीपात्रात वाहून येईल. याच काळात तापीतील प्रदूषित पाणी आणि गाळामुळे जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. रेल्वे प्रशासनाने निधी मंजूर करूनही हे काम का होत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रकल्पाचे डिझाइन मिळणार
रेल्वेचेच कर्तव्य : तापीनदीपात्रात मिसळले जाणारे सांडपाणी प्रामुख्याने रेल्वे वसाहतीमधील आहे. रेल्वेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रकल्प उभारलेला नाही. यामुळे किमान रॉ-वॉटर पंपिंग हाऊसच्या पश्चिमेकडील भागात हे पाणी वळवणे रेल्वेचे कर्तव्य आहे. याच हेतूने हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, काम नेमके का रखडले याचे कारण गुलदस्त्यात आहे.

पाटबंधारे विभागाचीही मंजुरी : सांडपाणीव्यवस्थापन प्रकल्पासाठी पाटबंधारे विभागासह, रेल्वे प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी संयुक्त पाहणी केली आहे. यासाठी आवश्यक असलेली मंजुरीदेखील पाटबंधारे विभागाने दिली. यामुळे सध्या कोणतीही अडचण नसताना हे काम थांबले आहे. निधी उपलब्ध असतानाही काम कोणत्या कारणामुळे थांबले? याची माहिती मात्र रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केली जात नाही, हे विशेष.

पाहणी ठरली व्यर्थ
सांडपाणीव्यवस्थापनाच्या नियोजित कामाची तत्कालीन डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी पाहणी केली होती. त्यांची बदली झाल्यानंतर, डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनीही पाहणी करून या कामाला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सात ते आठ महिने उलटूनही काम रखडल्याने जलप्रदुषण सुरुच आहे.

नियमांना हरताळ
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दोन महिन्यांपूर्वीच नद्यांचे प्रदूषण थांबावे यासाठी, प्रत्येक प्रमुख नदी तटावर फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या फलकावर नदीतील पाण्यात किती प्रदूषित घटक आहेत, याची माहिती दिली जावी, याबाबत अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र, तापी तटावर या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया करता थेट नदीपात्रात सोडले जाते. विशेष करून पालिका आणि रेल्वे पंपिंग हाऊसच्या पूर्वेकडील भागातून येणारे सांडपाणी नदी प्रदूषित करण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे.

तरच मिळेल शुद्ध पाणी : रेल्वेविभागासह पालिका हद्दीतील भागाचेही सांडपाणी कोणतीही प्रक्रिया करता थेट नदीपात्रात सोडले जाते. पालिकेसह आणि रेल्वेचेही जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे कार्यक्षम नाही. यामुळे शहरासह रेल्वे विभागालाही दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रामुख्याने भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर प्रकल्प आदी योजना राबवणे आवश्यक आहे. तरच रेल्वेसह पालिका हद्दीतील दूषित पाण्याचा प्रश्न सुटेल.

- रेल्वे प्रशासनाकडून निधी मंजूर झाला असून नियोजन तयार करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले असून ते लवकरच पूर्णत्वाकडे येईल. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे डिझाइनदेखील मिळणार असल्याने आगामी काळात तापीचे प्रदूषण निश्चितपणे थांबेल. आर.एन.देशपांडे,विभागीयअभियंता, रेल्वे जलशुद्धीकरण विभाग
बातम्या आणखी आहेत...