आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण थांबेना: दीपनगर प्रकल्पाच्या राखवाहिनीतील हजारो मेट्रिक टन राख रस्त्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राखवाहिनीची गळती होऊन फ्लायअँश थेट जमिनीवर, शेतीशिवारात आणि नाल्यांमध्ये साचली आहे. कंत्राटदारास दिलेल्या अटी शर्तीनुसार ही राख वेळोवेळी उचलून तिची बंडात विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने हजारो मेट्रिक टन राख 14 किलोमीटरच्या क्षेत्रात ‘जैसे थे’ आहे.

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून निघणारी राख 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेल्हाळे अँश बंडात सोडली जाते. राखेची पाइपलाइन फुटण्याचे प्रमाण अधिक असल्याने राखमिर्शीत पाणी थेट जमिनीवर किंवा जांभुळनाल्यात साचते. नियमानुसार ही राख पाइपलाइन दुरुस्तीचा कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांने वेल्हाळे बंडात उचलून टाकणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासूनची राख त्याच ठिकाणी पडली आहे. कंत्राटदार बदलेले मात्र ही स्थिती बदलण्याचे नाव घेत नाही. अनेक वर्षांपासून 14 किलोमीटरच्या क्षेत्रात पाइपलाइनच्या बाजूस पडलेली राख आता डोकेदुखी ठरत आहे. उन्हाळ्यात वार्‍याचा वेग अधिक असल्याने फ्लायअँश थेट परिसरातील शेतजमिनीवर मिसळली जाते. राखेचे लोट शेतीशिवारात जात असल्याने जमिनीच्या सिमेंटीफिकेशनची क्रिया होत आहे. भविष्यात यामुळे उत्पादनात घट होणे शक्य आहे. ठेके दाराने फुटलेल्या राखवाहिनीतून निघालेली राख का उचलली नाही? याबाबत दीपनगर प्रशासनाने कंत्राटदारास एकदाही जाब विचारला नाही हे विशेष. सध्याच्या कंत्राटदाराला केवळ एक वर्षच झाले. मात्र, यापूर्वीच्या ठेकेदाराने अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या नावांनी कंत्राट घेतले होते. अधिकार्‍यांशी लागेबांधे असल्याने हा प्रकार बिनदिक्कत सुरूच आहे.

पाइपलाइन परिसरात बोरी-बाभळींचे जाळे
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी दीपनगर प्रशासनाने मोठय़ाप्रमाणात स्थानिक झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. सध्या येथे पाइपलाइनच्या आजूबाजूस मोठय़ाप्रमाणात बोरी, बाभळींची झुडपे वाढली आहेत. पाइपलाइनचा परिसर स्वच्छ ठेऊन बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्ती करता येईल, असा असावा. कंत्राटदार झुडपेदेखील तोडण्याचे कष्ट घेत नसल्याने पाइपलाइन फु टल्यावर जोडणीसाठी पर्शिम घ्यावे लागतात.

पाहणीअंती कारवाईचे पाऊल उचलणार
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने यासंदर्भातील बाब गंभीररीत्या घेतली आहे. कंत्राटदाराने फुटलेल्या पाइपलाइनमधून निघणारी राख उचलण्याचे देखील पैसे घेतले असल्याने ते काम त्याने करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल. पाइपलाइनची संपूर्ण पाहणी करून असे प्रकार घडत असतील तर कारवाई करू. पर्यावरणप्रश्नांनी वीजनिर्मिती केंद्र प्रशासन गंभीर आहे.
- एल. बी. चौधरी, उपमुख्य अभियंता, दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्प