आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून तरुणीला अश्लील संदेेश; राष्ट्रवादी विद्यार्थी नेत्याचा उद्याेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ‘इंस्टाग्राम’या सोशल मीडियाच्या साइटवर बनावट अकाउंट तयार करून मुंबई येथे राहणाऱ्या एका तरुणीला राष्ट्रवादी विद्यार्थी नेत्याच्या नावाने चार महिन्यांपासून अश्लील एसएमएस पाठवण्याऱ्या जळगावच्या टवाळखोर तरुणास पोलिसांनी बुधवारी अटक केली. जळगावातील एका मित्राच्या नावाने हे एसएमएस जात असल्यामुळे या दोघांमध्ये याबद्दल चर्चा झाली. पोलिसांच्या सायबर सेलने सुमारे पाच महिने तपास केल्यानंतर हा टवाळखोर जळगाव शहरातच राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. अखेर बुधवारी पोलिस त्याच्यापर्यंत पोहचले. गौरव नरेंद्र राणे असे टवाळखाेराचे नाव आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गेल्या वर्षीही त्याने पुण्यातील एका तरुणीला व्हॉटस्अॅपवर अश्लील संदेश पाठवून हैराण करून सोडले होते. 


राधाकिसनवाडी येथे राहणारे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अखिल संतोष चौधरी (वय २९) याचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर अकाउंट आहे. तर मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या एक मैत्रिणीचे देखील इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. दरम्यान, जुलै २०१७ रोजी चौधरी यांच्या अकाउंटवरून मुंबईतील मैत्रिणीला अश्लील एसएमएस, व्हिडिओ सेंड झाले. त्यामुळे मैत्रिणीने १० जुलै २०१७ रोजी फोन करून असे मॅसेज का पाठवले याचा जाब देखील विचारला. मात्र, आपण असे एसएमएस केले नसल्याचे सांगत चौधरी यांनी बनावट अकाउंटचा शोध सुरू केला होता. त्यानंतर देखील काही वेळा हा प्रकार सुरूच राहिला. अखेर चौधरी यांनी दि. ११ जुलै २०१७ रोजी जळगावातील सायबर सेल येथे तक्रार अर्ज दिला . तेंव्हापासून सायबर सेलच्या पथकाने या अकाउंटची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. बुधवारी गोलाणी मार्केटमधून गौरव राणे नावाच्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चौधरींच्या नावाने बनावट अकाउंट तयार केल्याची कबुली राणे याने दिली आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 


रात्रंदिवस घेतला शोध
बनावट अकाउंट तयार करून ते वेगवेगळ्या ठिकाणांवरून ऑपरेट होत होते. ही माहिती मिळाल्यानंतर सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाने, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, संदीप सावळे, दिनेश बडगुजर यांच्या पथकाने गेल्या चार महिन्यांपासून या तक्रारीचा पाठपुरावा केला. रात्री उशिरापर्यंत हे अकाउंट ऑपरेट होत असे. परंतु कधी मोबाइलवरून तर कधी संगणकावरून हाताळले जात असल्यामुळे तपासात अनेक अडचणी येत होत्या. अखेर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केट परिसरात एका मोबाइलवरून हे अकाउंट हाताळले जात असल्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने गौरव राणे याला ताब्यात घेतले. गौरवच्या मोबाइलमध्ये हे अकाउंट सुरू होते. त्याने तशी कबुलीदेखील दिली. 


तक्रारी करण्याचे नागरिकांना आवाहन
सध्यासायबर क्राइम मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. यात टारगट तरुणांकडून युवतींना टारगेट केले जाते. अनेक वेळा बदनामी होण्याच्या भीतीने युवती किंवा त्यांचे पालक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे टवाळखोरांना फावते. अशा गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांचे नाव गुपित ठेऊन कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

 

गेल्यावर्षी देखील गुन्हा 
गौरवने गतवर्षी व्हाॅट्सअॅप ग्रुपवर अश्लील संदेश पाठवल्याचे उघडकीस आले होते. या ग्रुपमध्ये काही तरुणी होत्या. त्यातील एका तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंप्री पोलिस ठाणे (जि.पुणे) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात गौरवला अटकही करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळाली आहे. 


माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार वर्षांची शिक्षा
सोशल मीडियावरून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई केली जाते. गौरव याच्याविरोधात ६६ (सी) (डी), ६७ (अ) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास जास्तीत-जास्त वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा त्याला ठोठावली जाऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...