आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Posibility Of Dhule Jilha Parishad's One Group,Two Corum Decrease

धुळे जिल्हा परिषदेचा एक गट , दोन गण कमी होण्याची दाट शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत डिसेंबर 2013मध्ये संपत आहे. त्यामुळे होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने गट, गणांची रचना करण्यात येणार आहे. दरम्यान, शिंदखेडा येथे नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण घटण्यावर होणार आहे. निवडणूक आयोगाने सन 2001ची जनगणना ग्राह्य धरल्यास एक गट आणि दोन गण कमी होऊ शकतात.

धुळे जिल्हा परिषदअंतर्गत धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा या चार पंचायत समित्या येतात. त्यात जिल्हा परिषदेचे 55 गट आहेत तर चारही पंचायत समित्या मिळून 110 गण आहेत. सन 2001च्या जनगणनेनुसार ही रचना करण्यात आली आहे. साधारणपणे 30 ते 35 हजार लोकसंख्येसाठी एक गट आणि एका गटात दोन गण म्हणजे प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येचा एक गण असतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते. त्यासाठी निवडणूक आयोग जिल्हा कार्यालयाकडून प्रथम जिल्ह्यातील लोकसंख्येची माहिती मागवत असते. त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या किती आहे, हे पाहून निवडणूक आयोग गट, गणांचे आरक्षण काढते. शासनामार्फत दर 10 वर्षांनी देशाची जनगणना केली जाते. त्यानुसार सन 2011मध्ये जनगणना करण्यात आली आहे; परंतु त्यातील लोकसंख्येबाबतच्या अंतिम आकड्याची घोषणा अद्याप झालेली नाही. डिसेंबर 2013मध्ये होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सन 2001ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. त्याची माहिती निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून मागविली आहे. ही माहिती पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला 1 एप्रिल 2013ची मुदत देण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन गण कमी होण्याची शक्यता आहे.

पाचही वर्षे गाजली.

जिल्हा परिषदेच्या 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच गेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन शिवसेना, भाजपची सत्ता आली होती. तसेच धुळे पंचायत समिती आणि शिंदखेडा पंचायत समितीतही सत्तांतर झाले. त्यानंतर बंडखोरी करणार्‍यांना अपात्र ठरविणे, पोटनिवडणुका, अडीच वर्षांनंतर पुन्हा सत्तांतर, त्यासाठी कॉँग्रेसच्या दोन्ही गटात झालेला समेट आदींमुळे पाचही वर्षे जिल्हा परिषदेतील राजकारण गाजत राहिले.

महिलांना मिळणार संधी
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33 ऐवजी 50 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. विद्यमान स्थितीत 55 पैकी 18 महिला सदस्या जिल्हा परिषदेत आहेत. तर पंचायत समितीच्या 110 गणांपैकी 37 महिला सदस्या आहेत. महिलांना आगामी काळात 50 टक्के आरक्षण राहणार आहे. 55 पैकी एक गट कमी झाल्यास 54 गट आणि 108 गण शिल्लक राहतील.

मे महिन्यात घोषणा
जिल्ह्यातील लोकसंख्येबाबतच्या माहितीसाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. ही माहिती पाठविल्यानंतर निवडणूक आयोग संपूर्ण अभ्यास करून अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन होणार्‍या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट, पंचायत समितीचे गणांची घोषणा करेल. मे महिन्यात नव्या गट, गणांची घोषणा केली जाऊ शकते.

नगरपंचायत आली अस्तित्वात.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य सुभाष माळी यांनी आपले पद रद्द करण्याबाबत शासनाला विनंती केली होती. त्यांच्या मान्यतेनुसारच शिंदखेडा नगरपंचायत अस्तित्वात आली; परंतु आता नगरपंचायत असल्याने जिल्हा परिषदेचा गटही रद्द होईल. तसेच या गटात येणारा पाटण गणही रद्द होऊन पाटण गाव दुसर्‍या गणाला जोडले जाईल. त्याचा परिणाम पंचायत समिती सदस्यांची संख्या कमी होईल.