आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाच्या बचत योजनेत फसवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह वाटणार्‍या पोस्टाच्या सुरक्षा ठेव योजनेबाबतही नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. एजंटमार्फत खातेदारांची फसवणूक होत असल्याने अनेकांना कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळण्यास अडचणी येत आहेत. यासंदर्भात अनिल बुवा या ठेवीदाराने ‘दिव्य मराठी’ कडे तक्रार केली आहे. दरम्यान, पोस्ट ठेव योजनेत एजंटकडून फसवणूक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही, असे सांगून पोष्टाने जबाबदारी झटकली आहे.

निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम सुरक्षित ठेवून उर्वरित आयुष्य आरामात जगता यावे म्हणून ज्येष्ठ नागरीक विविध सरकारी तसेच खासगी विमा योजनेत गुंतवणूक करत असतात; मात्र या योजनेत होणार्‍या फसवणुकीमुळे नागरिक सुरक्षित ठेव म्हणून पोस्टाला प्रथम प्राधान्य देतात. तथापि, आता पोस्टातील ठेवीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. पोस्टात फिक्स डिपॉझिट केल्यानंतर एजंटमार्फत ठेवीदारांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. सेवानिवृत्त सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अ.अ.बुवा हे आपले पैसे परत मिळावेत म्हणून लढा देत आहेत; मात्र त्यांना पोस्ट ऑफिस किंवा एजंटमार्फत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. बुवांसारख्या अन्य नागरिकांचीही फसवणूक झाल्याने पोस्टाच्या ठेवीसंदर्भात आता प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अशी अडकली बुवांची पोस्टात रक्कम - बुवा यांनी डिसेंबर 2012 मध्ये स्वत:च्या व प}ीच्या नावे प्रत्येकी 3 लाख रूपयांची फिक्स डिपॉझिट खाते पोस्टात उघडले. त्यासाठी त्यांनी र्शीमती शुभांगी लोखंडे व संदीप लोखंडे या एजंटस्च्या सांगण्यावरून फिक्स डिपॉझिटच्या व्याजाच्या रकमेतून एक हजार 375 रुपयांचे आर.डी.अकाउंट उघडले. त्यासाठी बुवा यांना दरमहाच्या रकमेसाठी लोखंडे यांच्याकडे कोर्‍या विड्रॉल स्लिपवर स्वाक्षरी करून रक्कम फिक्स डिपॉझिटच्या व्याजापोटी मिळत होती. दरम्यान, र्शीमती लोखंडे यांच्याकडून बुवा यांना पासबुक देण्यात आले नाही. यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी विचारणा केली; मात्र लोखंडे यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. 4 ऑगस्ट 2012 रोजी बुवा यांचे आर.डी. खाते मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना पाच वर्षांत जमा झालेली रक्कम व त्यावर असलेले व्याज मिळणे अपेक्षित होते; मात्र ती रक्कमदेखील मिळाली नाही. यासंदर्भात बुवा यांनी सिटी पोस्टात चौकशी केली असता, पाच वर्षांत फक्त 3 महिन्यांचीची रक्कम संबंधित महिला एजंटने भरली होती. त्यामुळे 50 महिन्यांची रक्कम गहाळ करण्यात आली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत बुवा यांनी वेळोवेळी पोस्ट ऑफिसमध्येदेखील तक्रार केली; मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. बुवांसारखाच इतर ठेवीदारांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पोस्टाचा कानाडोळा - पोस्टात विविध प्रकारच्या खात्यांची रक्कम दरमहा जमा करण्यासाठी विशेष एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात महिला एजंटची संख्या जास्त आहे. या सर्व एजंटस्ची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. एजंट योग्य वेळी हप्ता भरतात किंवा नाही याची चौकशी करण्याची जबाबदारी टपाल खात्याची आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ठेवीदारांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहे. एजंट हा ठेवीदार आणि टपाल विभागाला जोडणारा दुवा असताना त्याची माहिती टपाल विभागात नसल्याने पैसे गहाळ करण्याच्या प्रकारांचा ठेवीदारांना सामना करावा लागत आहे. एजंट नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याने पोस्ट विभाग मात्र त्यात स्वारस्य दाखवत नाही. खातेदाराच्या अडचणीचीदेखील दखल घेतली जात नाही. रक्कम संकलित करणारा एजंट हा पोस्टाशी निगडित घटक आहे. तरीही ठेवीदारांची फसवणूक झाल्यानंतर पोस्ट आपली जबाबदारी झटकते. त्यामुळे फसवणूक झालेल्याने दाद मागावी तरी कोणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आर.डी.अकाउंटमध्ये झालेल्या फसवणुकीसंदर्भात टपाल विभागात तक्रार केली; मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. माझ्यासारख्या अनेक ठेवीदारांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अनिल बुवा, तक्रारदार
बुवा यांच्या ठेवीची रक्कम किंवा खात्यासंदर्भात काहीच अडचण नाही. त्यामुळे मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे. संदीप लोखंडे, एजंट