आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टपाल कार्यालयात जाण्यासाठी शोधावी लागतेय वाट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील मुख्य टपाल कार्यालयात येणारे नागरिक आणि कर्मचारी आवारातच अस्ताव्यस्त वाहने लावतात. त्यामुळे टपाल कार्यालयात कामकाजासाठी येणा-याना टपाल कार्यालयात जाण्यासाठी अक्षरश: रस्ता शोधावा लागतो. हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील टॉवर बागेजवळील कस्तुरबा हॉस्पिटलसमोर मुख्य टपाल व भारत संचार निगम लिमिटेडचे कार्यालय आहे. टपाल कार्यालयात नागरिकांची नेहमी गर्दी असते. त्यात विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांचा समावेश आहे. याचठिकाणी दूरसंचार विभागाचे कार्यालय असल्याने तेथेही दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. दोन्ही कार्यालयात येणारे नागरिक टपाल कार्यालयाच्या आवारात प्रवेशद्वारासमोरच वाहने पार्किंग करतात. त्यामुळे टपाल कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांना या वाहनांमधून वाट काढत जावे लागते.
मुख्य टपाल कार्यालयाची जागा मोठी असली तरी पाठीमागील बाजूस कर्मचा-याच्या वाहनांसाठी असलेल्या जागेवर कार्यालयाने इमारत बांधल्याने वाहने पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे कर्मचा-यासह नागरिक मुख्य इमारतीच्या बाजूला किंवा समोर बेशिस्तपणे वाहने उभी करतात. टपाल विभागाच्या टपाल बॅग वाहतुकीसाठी असलेल्या लोखंडी जाळीच्या गाड्याही आवारात उभ्या असतात. बीएसएनएलमधील अधिकारी त्यांची चारचाकी वाहनेही प्रवेशद्वारासमोर किंवा समोरील हॉस्पिटलच्या भिंतीलगत उभी करतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या भागात सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत वाहतुकीची अनेकदा कोंडी होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी टपाल कार्यालयाकडून उपाययोजना करण्यात आल्या; परंतु काही काळानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
दूरसंचार विभागाकडून अडवणूक - टपाल कार्यालयाशेजारी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीतर्फे नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांकडून कंपनीच्या आवारात वाहन लावण्यास प्रतिबंध केला जातो. बीएसएनएलकडे येणारे नागरिकही टपाल कार्यालयाच्या आवारातच वाहने लावतात. वास्तविक बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात आणि पाठीमागील बाजूस मोकळी जागा असताना त्याठिकाणी केवळ कर्मचा-याना वाहने लावू दिली जातात.कंपनीच्या या अडवणुकीच्या धोरणाचा फटका वाहनचालकांना बसतो.