आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Postal Exam Center Issue At Jalgaon, Divya Marathi

परीक्षेसाठी नाशिकऐवजी मिळाले कोल्हापूर केंद्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारतीय डाक विभागातर्फे होणार्‍या पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट या पदांच्या परीक्षेसाठी नाशिक केंद्रासाठी अर्ज भरणार्‍या उमेदवारांना कोल्हापूरचे केंद्र मिळाले आहे. पोस्ट विभागाने नेमलेल्या एजन्सीच्या अफलातून प्रकारामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील जवळपास 150 विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
पोस्टल असिस्टंट पदासाठी सरळ भरतीद्वारे 11 मे रोजी दुपारी दोन ते पाच यावेळेत लेखी परीक्षा होणार आहे. राज्यातील सात केंद्रांवर तीन लाख 60 हजार उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर या केंद्रांवर परीक्षा होईल. जम्बो भरतीच्या नियोजनासाठी डाक विभागाने खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. त्यामुळे भरतीप्रक्रियेत डाक विभागाचा कुठेही संबंध नसल्याने परीक्षा अर्ज भरण्यापासून केंद्र, उमेदवाराना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एजन्सीकडे आहे. जिल्ह्यातील 150 उमेदवारांनी परीक्षेसाठी नाशिक केंद्राची निवड अर्ज भरताना केली होती. अर्जातील वैयक्तिक माहितीतही तेच केंद्र आहे. परीक्षा प्रवेशपत्रात मात्र, कोल्हापूर केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांना जळगावातून 550 किमी अंतरावरील कोल्हापूरला जाणे शक्य नाही. बेरोजगारीमुळे उमेदवारांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने स्पर्धकांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.

अधीक्षकांनी झटकली जबाबदारी
उमेदवारांनी डाक अधीक्षक आर.डी.तायडे यांची सोमवारी भेट घेतली. केंद्र बदलल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनात आणून दिला. मात्र, त्यांनी परीक्षा नियोजनाची जबाबदारी एजन्सीकडे आहे. नियोजनात बदल होणार नाही, असे तायडे यांनी उमेदवारांशी चर्चा करताना सांगितले. याविषयी तायडे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.
डाक विभागाने खासगी एजन्सीला परीक्षेचे काम दिले आहे. यात पोस्टाचा कुठेही हस्तक्षेप नाही. नाशिक केंद्रावर विद्यार्थी संख्या जास्त झाल्यामुळे जळगावच्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर केंद्र दिले असावे. यात बदल होणे अशक्य आहे. एम.एस.जगदाळे, सहायक डाक अधीक्षक

नाशिक, औरंगाबाद येथे उमेदवार संख्या अधिक
जळगावसह जिल्ह्यातून पोस्टाची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी नाशिक, औरंगाबाद हे केंद्र निवडले आहे. त्यामुळे येथे परीक्षा देणार्‍या उमेदवारांची संख्या मोठी आहे.