आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा; दीपनगरातील बंद संच पुन्हा होणार कार्यान्वित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - दीपनगरातील वीजनिर्मिती संच महिनाभरापासून बंद अाहेत. मात्र, आगामी दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढणार असल्याने संच कार्यान्वित होण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात १० हजार मेगावॅटवर असलेली महावितरणची वीजमागणी सध्या १४ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेची मागणी अाणखी दोन ते अडीच हजार मेगावॅटने वाढल्यास दीपनगरातील किमान एक संच कार्यान्वित होण्यास मदत होईल.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील चारही संच गेल्या महिनाभरापासून बंद आहेत. राज्यभरात होत असलेल्या सलग पावसामुळे कृषीचा वीजवापर घटला आहे. उन्हाळ्यात तब्बल १६ ते १६ हजार ५०० मेगावॅटवर महावितरणची वीज मागणी होती. मात्र, पावसामुळे ही मागणी १० हजार मेगावॅटपर्यंत खालावली. राज्य शासनाने खासगी कंपन्यांसोबत केलेल्या पॉवर परचेस अॅग्रीमेंटनुसार खासगी कंपन्यांकडून विजेची खरेदी करावी लागत आहे. तर दुसरीकडे महानिर्मितीचे संच यामुळे बंद राहत असल्याचे चित्र आहे. सध्या दीपनगरसह राज्यभरातील तब्बल १७ औष्णिक वीजनिर्मितीचे संच बंद आहेत. दरम्यान आता गेल्या आठवड्यापासून मान्सून माघारी परतला आहे. भुसावळ विभागासह राज्यभरात कोठेही आठवडाभरात पावसाची नोंद नाही. तर दुसरीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढत आहे. आगामी काळात दिवाळीचा सण असल्याने घरगुती आणि कृषीचा वीजवापर वाढणार आहे. सध्या महावितरणची वीज मागणी १४ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. यामध्ये पुन्हा वाढ झाल्यास दीपनगरातील ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचा किमान एक संच तरी कार्यान्वित होणार आहे. सध्या दीपनगरातील सर्व चारही संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही. तर कंत्राटदारांकडे असलेल्या कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारी कोसळली आहे. दीपनगर संच बंद असल्याने परिसरातील सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच दिवाळीपर्यंत कार्यान्वित होईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना असल्याने किमान दिवाळी सण आनंदात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संच कार्यान्वित झाल्यास दीपनगर केंद्राच्या परिसरात अर्थकारणाला चालना मिळेल.

अॅश वॉटर प्रकल्पाला ब्रेक
दीपनगर केंद्रातून राख वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या अॅश वॉटर रिकव्हरी योजनेलाही संच बंदमुळे ब्रेक लागला आहे. सध्या महिनाभरापासून आणि त्यापूर्वीही तब्बल ४७ दिवस संच बंद असल्याने या योजनेची चाचणी झाली नाही. संच कार्यान्वित झाल्यास या योजनेच्या अंतिम चाचणीला गती येईल.

१६ हजार मेट्रिक टन कोळसा साठा
दीपनगर केंद्रातील विजेची निर्मिती ठप्प झाल्याने केंद्रात तब्बल १६ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक ठेवण्यात आला आहे. या दरम्यान कोळशाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. साठवलेल्या कोळशावर आर्द्रतेचा परिणाम होऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत.

कृषीचा वीजवापर अधिक
महावितरणकडे सध्या कृषी वीज वापराची मागणी अधिक आहे. यामुळे सतत पाऊस सुरू झाल्यास शेतांमध्ये पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज भासत नाही. यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात घसरते. मात्र, सध्या ऑक्टोबर हीटमुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून विहिरी कूपनलिका सुरू केल्या जात आहेत. आठवडाभरानंतर रब्बीची पेरणी सुरू होईल, यानंतर पुन्हा मागणी वाढून बंद असलेले वीजनिर्मिती संच कार्यान्वित होतील, अशी अपेक्षाही वर्तवली जात आहे.

^राज्य शासनानेखासगी कंपन्यांसोबत केलेला पीपीए (पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट)सर्वांत आधी रद्द करावा. दिल्लीसह अनेक राज्यांनी असे करार रद्द केल्याने सरकारी विजेची मागणी वाढली. याच पद्धतीने बेकायदेशीररीत्या झालेले करार रद्द करणे आवश्यक आहे. भारतठाकरे, उपाध्यक्ष, विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियन

^सध्या ऑक्टोबरहीटचा तडाखा वाढत असून विजेची मागणी कायम आहे. येत्या आठवड्यात यात पुन्हा वाढ झाल्यास दीपनगरातील संच कार्यान्वित होऊ शकतात. मागणीच नसल्याने संच बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, तो कायमस्वरुपी नाही. अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर
बातम्या आणखी आहेत...