धुळे - प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हा दोन लाखांचा तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हादेखील दोन लाखांचा अपघाती विमा अशा एकूण चार लाखांच्या योजना केवळ ३४२ रुपयांत सामान्य नागरिकांना उद्या मंगळवारपासून उपलब्ध होणार आहेत. स्टेट बँकेत मंगळवारपासून या योजनेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी २५ मेपर्यंत अर्ज उपलब्ध राहणार आहेत. सामान्य नागरिकांना जून २०१५ ते ३१ मे २०१६ पर्यंत या दोन्ही योजनांमुळे चार लाखांच्या विम्याचे कवच मिळणार आहे.
सर्वसामान्यांचे आयुष्य विमा सुरक्षेच्या कक्षेत यावे यासाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन नवीन योजनांची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, उद्या मंगळवारपासून स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांमध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. त्यात प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना हा दोन लाखांचा नैसर्गिक मृत्यूसाठी असून, तो १८ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी तो असेल.
केवळ ३३० रुपयांत हा विमा उतरवता येणार आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा दाेन लाखांचा विमा अपघातात दुखापतीसाठी तसेच अपंगत्वासाठी लागू असणार आहे. हा विमा केवळ १२ रुपयांत वर्षभरासाठी उपलब्ध असेल. १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे सामान्य नागरिकांनी ३४२ रुपये भरल्यास त्यांना चार लाखांचे विमा कवच प्राप्त होणार आहे. स्टेट बँकेच्या सर्वच शाखांमध्ये यासाठी अर्ज उपलब्ध राहणार असून, ग्राहक सेवा केंद्रात सदर रकमेची पावती भरून दिल्यासही हा विमा खातेधारकांना काढता येईल. स्टेट बँकेत खाते असलेल्यांनी अर्जासह पावती भरून दिल्यास विम्यासाठीची रक्कम त्यांच्या खात्यातून डेबिट करण्यात येईल.
नागरिकांनी घ्यावा लाभ
केंद्र सरकारने सुरू केलेल्या या दोन विमा योजना सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असून, धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा स्टेट बँकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी उद्या मंगळवारपासून बँकेच्या सर्वच शाखांमध्ये अर्ज उपलब्ध होणार आहेत. केवळ १२ आणि ३३० रुपयांत एकूण चार लाखांचा विमा मिळणार असल्याने नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सुनीलदेवळेकर, सहायक महाप्रबंधक, स्टेट बँक
या योजना सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या असून, केंद्र शासनाकडून त्या सुरू करण्यात आल्या आहेत. उद्या मंगळवारपासून २५ मेपर्यंत त्यासाठी अर्ज स्वीकृती करण्यात येणार असून, स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल. जी.एम. अजयकुमार, मुख्य प्रबंधक, क्रेडिट अँण्ड एमपीए