आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pradip Raisony Says Suresh Jain Is Main Culprit Of Gharkul Scam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैन यांनीच घडवला अपहारः प्रदीप रायसोनीचा धक्‍कादायक जबाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- 'सुरेश जैन व खान्देश बिल्डर मिळून हुडकोकडून घेतलेल्या कर्ज रकमेमध्ये घरकुल बांधकामाच्या नावाखाली अपहार करीत आहेत हे मला समजत होते. परंतु पालिकेत जैन यांचीच सत्ता असल्याने मी त्याबाबत काहीच करू शकत नव्हतो', अशा शब्दात घोटाळय़ातील संशयित आरोपी प्रदीप रायसोनी यांनी सुरेश जैन यांनाच घोटाळय़ासाठी जबाबदार ठरविले आहे. अटक झाल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी रायसोनी यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला असून त्यात जैन यांच्या कार्यपद्धतीचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचे तपासाधिकरी इशू सिंधू यांच्या समक्ष नोंदविण्यात आलेल्या या जबाबाची टंकलिखित प्रत पहिल्या मूळ आरोपपत्राला जोडण्यात आली आहे. तीन पानांच्या या जबाबावर इशू सिंधू यांची स्वाक्षरी असून त्याची प्रत आज 'दिव्य मराठी'च्या हाती आली. त्यात रायसोनी यांनी घरकुल प्रकरणात गप्प राहाण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षांना व नगरसेवकांना आर्थिक व अन्य फायदे करून दिले जात होते, असेही नमूद केले आहे. अर्थात, नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील हे मात्र सातत्याने विरोध करीत होते, पण त्यांचा आवाज अन्य नगरसेवक गोंधळ घालून दाबून टाकत असत, असा खुलासाही या जबाबात करण्यात आला आहे.'जगन्नाथ वाणी व राजा मयूर हे जरी खान्देश बिल्डर्सचे संचालक असले तरी ही कंपनी सुरेश जैन यांचीच असून कंपनीला मिळणारा नफा हा जैन यांनाच मिळत होता', असे धक्कादायक विधानही रायसोनी यांच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.

रायसोनी उवाच्

> मंत्रिपदाचा उपयोग करून मी कर्ज मंजूर करवून आणतो, पण ठेका खान्देश बिल्डर्सलाच मिळाला पाहिजे, असे आदेश सुरेश जैन यांनी दिले होते.

> खान्देश बिल्डरला अँडव्हान्स देण्यास माझा व अभियंता खडके यांचा विरोध होता.

> 'तुम्हाला सांगतो तसे करा, बाकी मी पाहून घेईन', असे सुरेश जैन सांगत होते.

> जैन यांनी कामाबाबतचा खोटा अहवाल तयार करवून घेऊन हुडकोकडून कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर करवून घेण्यास सांगितले होते.

> नगरपालिकेत मी सुरेश जैन यांच्या वतीने व आदेशाने जे निर्णय घेत होतो त्याला नगरपालिकेतील कोणीही नगरसेवक विरोध करीत नव्हता. कारण इतर नगरसेवकांना नातेवाइकांच्या किंवा मित्रांच्या नावावर नगरपालिकेच्या कामांचे ठेके मिळत होते किंवा त्यांना रोख रक्कमही दिली जात होती. सदर कालावधीत नगराध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या सदस्यांना इतरही फायदे दिले जात होते.