आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसेवा, प्रज्ञाशोध परीक्षांनी गजबजले शहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. तसेच मूजे महाविद्यालयात जीईई, एमटीएस आणि मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी झुंबड उडाली होती. परीक्षा संपेपर्यंत पालक केंद्राजवळ थांबून होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. शहरातील 18 केंद्रांवर सकाळ, दुपार या दोन सत्रात झालेल्या परीक्षेस जिल्हाभरातील पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील 5252विद्यार्थी या परीक्षेस पात्र होते. सकाळी 10.30 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत ही परीक्षा झाली. परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी काम पाहिले. परीक्षेसाठी 3 समन्वय अधिकारी, 17 उपकेंद्रप्रमुख, 34 मदतनीस, 55 पर्यवेक्षक, 220 समवेक्षक, 52 शिपाई, 24 वाहनचालक व 24 वाहने यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासह सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर चार ते पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.

29 विद्यार्थ्यांनी दिली जीईई परीक्षा
एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जीईई परीक्षा मूजे महाविद्यालयात रविवारी घेण्यात आली. 29 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

एमपीएससी, यूपीएससी या परीक्षेची पूर्वतयारी आणि एमबीएसाठी कॅट परीक्षेच्या तयारीसाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची वाट न पाहता शिक्षण घेत असतानाच या परीक्षांची पूर्वतयारी विद्यार्थ्यांना करता यावी, यासाठी पुणे येथील वाडिया कॉलेजमार्फत जीईई ही सराव परीक्षा घेतली जाते. एसवाय आणि टीवायची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना ही या परीक्षेस बसता येते. मूजे महाविद्यालयाच्या केंद्रावर रविवारी सकाळी 10 ते 1 यावेळेत ही परीक्षा झाली. केंद्र प्रमुख म्हणून प्राचार्य अनिल राव व समन्वयक म्हणून व्ही.एस.झोपे यांनी कामकाज पाहिले. दरवर्षी ही परीक्षा घेतली जात असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.