आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांना पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणेचा खून करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपींना नशिराबाद पोलिस ठाण्यात प्रशांतच्या नातेवाइकांसमोर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे पाहून संतापलेल्या नातेवाइकांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन नागरिकांनी सविस्तर चर्चा करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच नशिराबादचे सहायक पोलिस निरीक्षक पी.टी. पाटील यांचेकडून तपास काढून घेण्याचे निवेदनही त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.
प्रशांतच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात केलेल्या आक्रोशानंतर व प्रशांतचे खरे मारेकरी नगरसेवक कैलास सोनवणे व त्याचा परिवार असल्याचा आरोप केल्यामुळे तसेच आरोपींना तत्काळ अटक करावी, असा आग्रह नातेवाइकांनी धरल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरसेवक सोनवणे यांचे भाऊ प्रल्हाद सोनवणे, विलास सोनवणे, संजय साळुंखे, सागर सोनवणे, विशाल सोनवणे, नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे, निशा सपकाळे यांना ताब्यात घेऊन नशिराबाद पोलिस ठाण्यात रवाना केले. सायंकाळी नशिराबाद पोलिसांनी तपासादरम्यान फक्त नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे व प्रदीप पाटील यांचेविरुद्धच गुन्हा दाखल करून त्यांनाच फक्त अटक केली. या संपूर्ण प्रकरणात नशिराबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने मंगळवारी सकाळी मयत प्रशांतचे नातेवाईक नशिराबाद पोलिस ठाण्यात माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे सहायक निरीक्षक पाटील हे या नातेवाइकांसमोरच संशयित आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचे लक्षात आले.
नातेवाइकांना उर्मट वागणूक - आरोपींना पोलिस ठाण्यात नाश्ता देण्यात येत होता. एवढेच नव्हे तर त्यांना पोलिस वागणूकही चांगली देत असल्याचे पाहून संतापलेल्या प्रशांतच्या नातेवाइकांनी पाटील यांना जाब विचारला असता, पाटील यांनी अत्यंत उर्मटपणे मी पाहून घेईन ते तुम्ही सांगण्याची गरज नाही. मला काहीही सांगू नका आरोपी कोण आहेत ते मला चांगले माहिती आहे, असे सांगून त्याना तेथून हुसकावून लावले. एवढेच नाही तर मयत प्रशांतची महिला पोलिस असलेली बहीण मीनाक्षी सोनवणे हीला देखील पाटील यांनी दमदाटी करीत तुझी नोकरी खावून घेईन, असे सांगत बाहेर हाकलून लावल्याने प्रशांतच्या नातेवाइकांचा संताप झाला.
पोलिस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी - संतापलेल्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठल्यानंतर तेथे त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी या प्रकरणात पैसे खाल्लय़ाचा आरोप करत त्यांच्याकडून तपास काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.आर. इंगवले यांनी त्यांना गेटवर अडवून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ पवार यांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले. पवार यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रय} केला. मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी नातेवाइकांच्या शिष्टमंडळाची पोलिस अधीक्षकांशी भेट घालून दिली.
पोलिस अधीक्षकांना निवेदन - पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी नातेवाइकांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या वेळी नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांना विविध मागण्यांबाबत निवेदन दिले. या निवेदनात प्रशांतचा खून कैलास सोनवणे याचे सांगण्यावरून नंदकिशोर सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, विलास सोनवणे, नरेंद्र सपकाळे, जयदीप सोनवणे, सागर सोनवणे, लक्ष्मी सपकाळे, विशाल सोनवणे, संजय साळुंखे यांनीच केला आहे. शनिवारी रात्री नंदकिशोर सपकाळे याने आपल्या मोबाइलवरून प्रशांतला फोन करून त्यास घरी बोलाविले. त्यानंतर त्यांनीच त्याला शेळगाव शिवारात नेऊन त्याचा खून केला. कैलास सोनवणे याच्या भावाची बायको कडगावची सरपंच आहे. तसेच त्याची याच भागात शेतीदेखील आहे. रविवारी आम्ही प्रशांत घरी नाही याची तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात गेलो असता, त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. याबरोबरच प्रशांतच्या खुनाचा तपास नशिराबाद पोलिसांकडून काढून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी या निवेदनातून केली आहे. निवेदनावर मयत प्रशांतची आई राधाबाई अंबादास सोनवणे यांची सही आहे.
पाटलांकडून तपास काढला - प्रशांतच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षक एस. जयकुमार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी.डी. गवारे यांची भेट घेऊन सहायक पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांचेकडून तपास काढून घेण्याची मागणी केली होती. त्याची पोलिस अधीक्षकांनी दखल घेत या गुन्ह्याचा तपास पाटील यांचेकडून काढून घेऊन भुसावळचे पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुन्हेगारी टोळ्यांचे नव्या एसपींना आव्हान - गेल्या काही वर्षांपासून कायम असलेली जळगाव शहरातील शांतता अचानक धोक्यात आली आहे. राजकारणातून पोसल्या गेलेल्या गुंड टोळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवत नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनाच एक प्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे हे आव्हान ते कसे परतून लावतात व किती दिवसात या गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करतात, याकडे शांतताप्रिय शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या पाच वर्षांत गुंड अथवा त्यांच्या टोळ्यांना आपला उपद्रव दाखवण्याचे धाडस करता आले नव्हते. संतोष रस्तोगी या एकमेव पोलिस अधीक्षकांनी आपल्या काळात या टोळ्यांना डोके वर काढू दिले नव्हते; मात्र गेल्या दोन दिवसातील घटनाक्रम पाहता या टोळ्या अचानक सक्रिय झाल्या असून, त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नाही, असे एकंदर सध्याचे चित्र आहे.
अलीकडेच प्रकाश मुत्याळ पोलीस अधीक्षक असताना माजी महापौर सदाशिव ढेकळे आणि नगरसेवक सुनील महाजन यांच्या गटात दोन वेळा धुमश्चक्री झाली; त्याचेच पर्यावसन तांबापुरा दंगलीत झाले. माजी महापौर अशोक सपकाळे आणि राष्ट्रवादीचे नवनाथ दारकुंडे यांच्या गटातील वादातूनही दारकुंडेंवर खुनी हल्ला झाला होता. त्याशिवाय कैलास भोळे विरुद्ध भिकन नन्नावरे यांच्या टोळ्यातही वीटभट्टीच्या वादातून गोळ्या चालल्या होत्या.
मुत्याळ यांच्या अखेरच्या दिवसात सुरू झालेल्या गैंगवारनंतर नव्या अधीक्षकांनी सूत्रे हाती घेताच रविवारी कुख्यात गुंड आबा बाविस्करच्या टोळीने अगदी बिनधास्तपणे शिवसेना उपशहरप्रमुख चेतन शिरसाळे यांच्या भररस्त्यावरील ‘कलाभवन’ या निवासस्थानावर बेछूट गोळीबार करीत अख्ख्या शहराचा थरकाप उडवून दिला. त्याच दिवशी दुसरीकडे नगरसेवक कैलास सोनवणेंच्या जवळच्या काही नातेवाइकांनी एका तरुणाला जिवंत जाळून ठार केले. एकाच दिवशी काही वेळाच्या अंतराने घडलेल्या या घटना गुंडांना कायद्याचा धाक नसल्याचे अधोरेखित करीत आहेत. सुडाच्या भावनेने पेटलेल्या या सशस्त्र टोळ्या एकमेकांच्या जिवावर उठल्या आहेत. त्यांना ना कायद्याची भीती ना समाजाची. कारण या टोळ्यांकडे भरपूर पैसा असून, त्यामुळे त्या उन्मत्त झालेल्या आहेत. तसेच त्यांची पाठराखण राजकीय पक्षांकडून होत असल्याने बिनधास्तपणे शहरात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा इरादा असल्याचे दिसून येत आहे. शहराला गुंड टोळ्यांची जुनी परंपरा असून, साधारणपणे सत्तरच्या दशकात या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता; मात्र नंतर राजकारणात गुंडांच्या उपद्रवाची उपयुक्तता लक्षात घेऊन बहुतेक सर्वच प्रमुख पक्षांनी राजकीय लढाई जिंकण्यासाठी त्यांचा वापर केला. कालांतराने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांची चांगलीच चलती झाली. राजकारणातून प्रतिष्ठा आणि पैसा मिळत असल्याने बहुतांश गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांनी टोळी बाळगण्यास सोडचिठ्ठी दिली नाही; पण गुंडगिरी मात्र म्यान केली. गेल्या पंधरा वर्षांत घडलेल्या काही घटनांचा आढावा घेतला तर तत्कालीन नगरसेवक शालिक सोनवणे, बापू ढंढोरे, सुनील पाटील, रणजित भोईटे, सचिन पाटील, चट्टय़ा बाप्या हे टोळीयुद्धाचे बळी ठरल्याचे दिसते. पूर्ववैमनस्यातून सूड उगवण्याचा हा प्रवास मध्यंतरी थांबला होता; परंतु आता नव्याने या टोळ्य़ांनी पुन्हा डोके वर काढले असून, त्यावर प्रभावी व कठोर कारवाई तातडीने होणे अपेक्षित आहे.
नव्या पोलिस अधीक्षकांनी पदाची सूत्रे स्वीकारताच आपला प्रभाव उमटवण्यासाठी शहरातील दुकाने, बाजार रात्री साडेदहाला बंद करण्याचे फर्मान काढले. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली; पण शहरातील व्यवहार रात्री लवकर बंद करून गुन्हेगारी कृत्ये कशी थांबवता येतील? हा खरा प्रश्न आहे. एरवी या शहरातील बाजारपेठांचे व्यवहार रात्री नऊलाच बंद होतात. त्यामुळे रात्री साडेदहाचे फर्मान काढून नूतन पोलिस अधीक्षकांनी काही नवीन केले, असे म्हणता येणार नाही. ‘कलाभवन’वर गुंड टोळीने केलेला गोळीबार व प्रशांत सोनवणेचा जाळून झालेला खून या घटना रात्री दहा वाजेपूर्वीच घडल्या. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी मूळ विषयावरच आपले लक्ष केंद्रित करावे, ही अपेक्षा आहे.