आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Sonawane Murder Case,Latest News In Divya Marathi

कैलास सोनवणेंसह 11 जणांना केले सहआरोपी; सोनवणे कुटुंबीयांना हजर होण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणे खून प्रकरणात राधाबाई सोनवणेंचा अर्ज न्यायालयात मंजूर झाल्याने खटल्याला नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित नगरसेवक कैलास सोनवणेंसह त्यांच्या परिवारातील 11 जणांना सहआरोपी करण्यात आले आहे. सर्व आरोपींना समन्स बजावण्यात येणार असून 14 ऑगस्ट रोजी न्यायाधीश एम.क्यू,एस.एम.शेख यांच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
रिधूरवाड्यातील प्रशांत अंबादास सोनवणे याचा 7 जुलै 2012 रोजी भादली शिवारात शेळगाव बॅरेजजवळ खून झाला होता. 9 जुलै 2012 रोजी त्याची ओळख पटली होती. आरोपी नरेंद्र सपकाळे याने प्रशांतला बोलावून नेले व त्यानंतर तो गायब झाला होता. याप्रकरणी मयत प्रशांतची आई राधाबाई सोनवणे ह्या शनिपेठ पोलिस ठाण्यात गेल्या. मात्र, 48 तास वाट पाहू; त्यानंतर हरवल्याची नोंद करू, असा सल्ला देण्यात आला. अखेर मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी नरेंद्र सपकाळे, प्रदीप पाटील, अनुसयाबाई सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती.

या घटनेमागे नगरसेवक कैलास सोनवणेंसह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा हात असल्याचा संशय प्रशांतच्या आईकडून व्यक्त होत होता. या घटनेची सीबीआय किंवा सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला म्हणून खंडपीठात अर्ज दाखल केला असून तो प्रलंबित आहे. याच प्रकरणात राधाबाई सोनवणेंचा सीआरपीसी 164 प्रमाणे न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला. यात कैलास सोनवणेंसह 12 जणांविरुद्ध जबाब दिला आहे.
आरोपींना समन्स बजावणार
दरम्यान, आरोपी लक्ष्मी सपकाळे हिने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला. सुनावणीदरम्यान खटल्याचा निर्णय लवकर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 16 जून 2014 रोजी राधाबाई सोनवणेंची साक्ष सत्र न्यायालयात घेण्यात आली. यात न्यायालयातील आरोपींव्यतिरिक्त नगरसेवक कैलास सोनवणे, नंदकिशोर सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, भारती सोनवणे, संजय साळुंखे, सागर प्रल्हाद सोनवणे, संजय सपकाळे, विलास सोनवणे, आदेश नरेंद्र सपकाळे, विशाल प्रल्हाद सोनवणे, जयदीप प्रल्हाद सोनवणे यांची नावे सांगितली. यासंदर्भात दाखल अर्ज न्यायालयाने सीआरपीसी कलम 319 प्रमाणे मंजूर करत कैलास सोनवणेंसह सर्वांना सहआरोपी करण्याचे आदेश दिले. या सर्व आरोपींना 14 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध समन्स बजावण्यासाठी राधाबाईंनी आरोपींची नावे, वय व पत्ते याची माहिती पुरवावी, असेही आदेश दिले.
आरोपी नरेंद्रचा जामीन फेटाळला
प्रशांत सोनवणे खून खटल्यातील प्रमुख आरोपी नरेंद्र सपकाळे याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन न्यायालयाने जामीन फेटाळला. सरकारतर्फे अँड.सुरेंद्र काबरा,आरोपींतर्फे अँड.अकील इस्माईल, मयताच्या आईतर्फे अँड.बिपीन पाटील, अँड.डी.जे.पाटील यांनी काम पाहिले.