आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला व्होट बँकेच्या गुलामगिरीतून मुक्त करा - प्रवीण तोगडिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - देशातील राजकीय पुढारी व्होट बॅँक टिकवण्यासाठी माकडासारख्या उड्या मारतात. त्यामुळे देश व्होट बॅँकेचा गुलाम झाला आहे. व्होट बॅँकेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बहिष्काराचा अवलंब करावा, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात शुक्रवारी सायंकाळी धर्मरक्षा निधी कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला 2014मध्ये 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत विश्व हिंदू परिषदेतर्फे देश, विदेशात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमासाठी निधी जमा करण्यासाठी धर्मरक्षा निधी संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत हा कार्यक्रम झाला. गोपाळ केले अध्यक्षस्थानी होते. या वेळी महापौर मंजुळा गावित, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संघटक भाऊ महाराज रुद्र, शहराध्यक्ष राजेंद्र निफाडकर गुरुजी, संजय महाराज अंतापूरकर, मधुकर महाराज वडगावकर, देवगिरी प्रांताचे महामंत्री रामदास लहाबल, श्रीप्रसाद कोरे, धोंडीअण्णा माळी, राजेंद्र खंडेलवाल आदी उपस्थित होते.

प्रवीण तोगडिया म्हणाले की, देशातील 100 कोटी हिंदूंसह जगात ठिकठिकाणी असलेल्या 10 कोटी हिंदूंवर अन्याय होत आहे. त्यांच्या रक्षणाचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. यापूर्वीही मोगल, इंग्रजांकडून हिंदूंवर अन्याय करण्यात आला. त्या वेळी सर्व हिंदू एकत्र आले. आजही सर्वत्र हिंदूंवर अन्याय होत आहे. त्याला कारण आपण एकत्र नाही. सर्व हिंदू एकत्र आल्यास कोणाचीही त्रास देण्याची हिंमत होणार नाही. मतांसाठी व्होटबॅँकेच्या तालावर देशातील नेते नाचण्याचे काम करत आहेत. या बॅँकेला आपल्याला पराभूत करावयाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने तीन गोष्टी केल्या पाहिजेत. गोमांस खाणार्‍यांवर सामाजिक बहिष्कार घालावा, विशिष्ट समाजाच्या व्हॉटबॅँकेशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, गोमांस खाणार्‍यांचे मत मागू नये, असेही ते म्हणाले. देशातील राजकारण्यांचेही हिंदूकरण झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी विश्व हिंदू परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी या वेळी केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रवीण तोगडिया यांचा जिल्हा व शहर विहिंप, बजरंग दलातर्फे सत्कार करण्यात आला. राजेंद्र खंडेलवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रामदास लहाबल यांनी प्रास्ताविक केले. भरत देवरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

संघटनासाठी सोशल मीडियाचा वापर
विश्व हिंदू परिषदेने संघटन मजबूत करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिंदू हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अन्याय, अत्याचार झाल्यास या हेल्पलाइनवर संपर्क केल्यास तत्काळ मदत केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटर आदींच्या माध्यमातून संघटन वाढवले जात आहे. त्यासाठी संकेतस्थळ, मोबाइल क्रमांक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.

धर्मरक्षा निधीचे संकलन
प्रवीण तोगडियांच्या भाषणापूर्वी धर्मनिधी संकलनासाठी सभागृहात कलश फिरवण्यात आले. सभागृहातील प्रत्येकाने यथाशक्ती मदत केली. त्यापूर्वी अध्यक्षीय भाषण करताना गोपाळराव केले यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश तोगडिया यांच्याकडे सोपविला.