आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंगवर पावसाची आळवणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - आपल्या देशातील शेती ही तशी बहुतांशी मेघांच्या मेहरबानीवरच अवलंबून आहे. म्हणूनच येथे ऋग्वेदांच्या श्रीमंती बढाव काळापासून ते आजच्या गरिबी हटाव जमान्यापर्यंत मेघांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. आकाशातील मेघ रुसले अन् त्यांनी चकवा दिला म्हणजे शेती व्यवसाय धोक्यात आलाच समजा. अशा वेळी ‘ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना’ असे आळवणी गीतगायन करून मेघांना आमंत्रणे देण्याशिवाय तरणोपाय नसतो. हीच परिस्थिती यंदाही उद्भवली आहे.

आकाशात कृष्णमेघांची गर्दी होते खरी, पण ते बरसत नसल्याने आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे बघण्याशिवाय गत्यंतर नाही. पावसाचे जोरदार आगमन व्हावे व वसुंधरेने थेंबन् थेंब रिचवून तृप्तीचा ढेकर द्यावा, यासाठी वरूणदेवतेची आळवणी सुरू आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे, धोंडी काढणे, होमहवन असे प्रकार पावसासाठी केले जात आहेत. नेटिजन्सही मात्र, यात आता मागे नाहीत. पाऊस चित्रे, वाकुल्या दाखवणारे ढग आणि वरूणराजाची विनवणी करणा-या कविता एकमेकांना लाइक करून आपल्या भावभावना मांडण्याचा प्रयत्न टेक्नोसॅव्ही नव्या पिढीकडून ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रभावशालीपणे केला जात आहे.

यज्ञ, मंत्र अन् पर्जन्यसुक्त
लांबलेल्या पावसाचे सुखद आगमन व्हावे, यासाठी ब्राह्मणवृंदांतर्फे भुसावळ येथे पर्जन्य यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी कोळी समाज मंगल कार्यालयात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम होईल. यज्ञासाठी बसणा-या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सूर्य तेजाचा महिमा आता सरला रे देवा
यावे भरूनी आभाळ आणि मेघ कोसळावा,
सारे सजीव पाहती आज वाट पावसाची
फौज येऊ दे नभात काळ्या सावळ्या ढगांची

- काळ्या ढगांवर देवा, क्लिक कर ना माऊस
आमच्या पृथ्वीवर आता पाड ना धो-धो पाऊस,
पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा, सिमेंट जंगलाचा कहर
बदलून दे ना आता हिरवागार स्क्रीन सेव्हर
- कमरेवरचे हात सोडूनी आभाळाला लाव तू
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू,
नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेलं गाव रे
लोकगीतांतून भावभावना
कृषी वैभव मांडणारी लोकगीतेही पाऊस लांबल्याने फेसबुक व मोबाइल्सवर पाठवली जात आहेत. ‘पानी पानी करता हारबळले लोक, पान्यानं टाकली लांब दोरी, सारी पान्याची नखीतर चालली खाली’ हे लोकगीत पाऊस लांबल्याची विदारकता मांडणारे आहे. समाधानकारक पाऊस झालाच तर रब्बीच्या आशा जिवंत राहतील. मात्र, तो यायलाच हवा, नाही तर काही खरं नाही, असं दु:ख या ओळीतून मांडण्यात आले आहे.

मोबाइलवरही साकडे
पावसाची नक्षत्र कोरडी चालल्याने शेतक-यांचा जीव टांगणीला आहे. या पार्श्वभूमीवर नगरदेवळ्याचे कवी गो.शि. म्हसकर लिखित ‘धूळ पेरणी करून जीव वा-याला टांगला, हिरव्या ऋतूला सोडून कुठे पाऊस पांगला?’ आणि ‘कोरडी सोडून माती मेघ काळा चालला, पावसावाचून सारा पावसाळा चालला’ या दोन कवितांचे मोबाइल्सवर आदान-प्रदान होत आहे.

विडंबनाला मिळतेय दाद
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर ‘हरवला आहे पाऊस, सापडल्यास खालील पुण्यातील पत्त्यावर आणून द्यावा. शोधणा-यास दोन वेळेस आंघोळीस पाणी मिळेल’ असे लहरी पावसाचे विडंबन करण्यात आले आहे. विडंबनातून मनोरंजन तर होतेच पण उपलब्ध जलसाठ्याचा वापर जपून करावा, असा संदेशही देण्याचा प्रयत्न आपसूक होत आहे.