आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prices Of Vegetables Declined Two Months Saw Increased Arrivals

भाजीपाल्याची आवक वाढल्याने दोन महिन्यात भाव घटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-फळभाज्या व पालेभाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी 70 रुपये किलो मिळत असलेल्या भाज्या आता 10 ते 15 रुपये किलो मिळत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्या आणखी स्वस्त झाल्या आहेत. सध्या प्रत्येक भाजीचे दर जवळपास 10 ते 20 रुपयांनी कमी झाले आहेत.

भाज्यांची आवक वाढली आहे. भाव आवाक्यात आल्याने सर्व भाज्यांचा आहारात वापर होत आहे. हिवाळ्यात पालेभाज्या खाण्याकडे जास्त कल असला तरी स्वस्त झालेल्या फळभाज्यांमुळे त्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकांची भाजी बाजारात गर्दी दिसत आहे. सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असल्याने महिलांसमोरील रोजच्या भाजीचा प्रश्न सुटला आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारची भाजी करण्याला वाव आहे. शहरात आजूबाजूच्या गावांमधून तसेच नाशिक, मनमाड, धरणगाव, एरंडोल, पहूर, भुसावळ आदी भागातून भाजीपाल्याची आवक आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे टमाटे आणि गुजरातचा हिरव्या वाटाण्याला विशेष मागणी आहे. सध्या बाजारात मेथी, पालक, फ्लॉवर, वालाच्या शेंगा, कोबी, वांगे, भेंडी, दोडके, दुधी भोपळा, गवार, टमाटे आदी फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत.

भाज्या व दर पुढील प्रमाणे

मेथी -10 रुपये , वालाच्या शेंगा-20 , कोबी - 15, वांगे -10 , भेंडी -20 , गवार - 40, टमाटे - 12, बटाटे - 20 , कांदे - 20, हिरवा वाटाणा - 15, गावराण मिरची 20, लवंगी मिरची 25, अद्रक - 100 रुपये, गिलके - 25, गाजर-15, मेथी - 10 रुपये किलो.

मुलांसाठी आहारात पर्याय उपलब्ध

सकाळी शाळेत जाताना मुलांना डब्यासाठी पोळी भाजी देण्याचा आग्रह असतो. त्यामुळे दररोज काय द्यावे हा प्रश्न भेडसावतो. परंतु आता भाज्यांची आवक वाढल्याने तसेच पालेभाज्यासोबत फळभाज्याही उपलब्ध असल्याने पर्याय उपलब्ध आहेत. मुलांना आवडेल ती भाजी करून देता येते. - सुवर्णा पाटील, गृहिणी

आहारात फळभाज्यांचे प्रमाण वाढले

विविध फळभाज्या, शेंगा स्वस्त झाल्याने आहारात त्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी पालेभाज्या आणि कडधान्याचा होणारा जास्त वापर आता कमी झाला आहे. रोज वेगवेगळ्या भाज्यांचा आहारात समावेश होतोय. दररोज नवीन भाजीचा पर्याय उपलब्ध असल्याने अडचणी येत नाहीत. निर्मला महाजन, शासकीय कर्मचारी.