आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राथमिक शिक्षणातच स्वदेशीचा विचार मुलांपर्यंत पोहोचवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ग्रामीणभागातील लोकांच्या हाताला काम मिळावे अन् हे काम त्यांना त्यांच्या शेती-मातीच्या परिसरातच करता यावे, तसेच तो जे पिकवतो त्या उत्पादनाला आपल्या रोजच्या अत्यावश्यक गरजांना जोडता यावे, या उद्देशाने महात्मा गांधींनी खादी ग्रामोद्योग चळवळीला परिवर्तनाचे माध्यम मानले. यात शेवटच्या घटकातील माणसाचा विकास व्हावा, ही दूरदृष्टी त्यांची होती, असे सांगून प्राथमिक शिक्षणातच स्वदेशीचा विचार मुलांपर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन महात्मा गांधींची नात इला गांधी यांनी केले.
शहरातील गांधीतीर्थ येथे ‘खादी क्षेत्रासमोरील आव्हाने गांधीजनांची जबाबदारी’ या विषयावर दोन दिवसीय खादी परिषदेचे उद‌्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी महात्मा गांधींची नात इला गांधी बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गांधीवादी राधा भट्ट, डॉ. रामजी सिंग, जयवंत मटकर, दलिचंद जैन, आदित्य पटनायक, चिन्मय मिश्र, महादेव विद्रोही, अशोक सरण उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी भारतातील १३ राज्यांतून सुमारे ७५ प्रतिनिधी उपस्थित आहेत. विनोबा जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सूतीहार अर्पण करण्यात आला.

गांधी म्हणाल्या, जगातील सर्वच देशात गरिबीचे आव्हान आहे. गरिबीच्या प्रश्नावर मात करण्यासाठी आज इथे जे आपण सर्वजण जमलो आहोत, त्या सर्वांच्या विचारांतून, चर्चेतून नेमके काय करू याचा विचार आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे पर्यावरण अडचणीत सापडले आहे. ज्या गांधीतीर्थ येथे आपण जमलो आहोत, त्या ठिकाणी बायोगॅसपासून सौरऊर्जेपर्यंत अतिशय चांगला वापर केला आहे. सौर तंत्रज्ञानाला इथे शेती विकासाची प्रगल्भ जोड दिली आहे. जर हे इथे इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे, तिथे त्याच्या प्रतिकृती इतर ठिकाणीही होण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जे पर्याय आपण ग्रामविकासाच्या दृष्टीने आजवर शोधत आलो आहोत, तो पर्याय मार्ग जैन हिल्स येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांिगतले. प्रास्ताविक दलिचंद जैन यांनी केले. गांधीजींच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, या ध्येयाने अल्पावधीत गांधीतीर्थ हे जगाच्या नकाशावर आले आहे, असे सांगून दलिचंद जैन यांनी युवापिढी गांधीतीर्थाशी जुळली जावी, या उद्देशाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. सुगण बरंठ यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयांवर सत्रनिहाय चर्चा केली जाणार आहे.

गांधींच्या तोंडी सतत राम आणि खादीचा उल्लेख
महात्मा गांधी यांच्या तोंडी सतत राम आणि खादीचा उल्लेख असायचा. त्यांच्या दृष्टीने खादी ग्रामोद्योग हे आर्थिक, अाध्यामिक राजनैतिक विकासाचे अस्त्र होते. हाताने कातलेली, हाताने विणलेली आणि ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या आपल्या कष्टकऱ्याला अर्थात खादी उत्पादकाला याचा पूर्ण मोबदला जिथे दिला जातो, ती खरी खादी असल्याचे डॉ. रामजी सिंग यांनी दुसऱ्या सत्रात सांगितले. या सत्रात डॉ. सुगण बरंठ अशोक मिश्रा यांनी भाग घेतला.
खादी परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद््घाटन करताना इला गांधी. समवेत दलिचंद जैन, जयवंत मठकर, चिन्मय मिश्रा, आदित्य पटनायक, महादेव विद्रोही.

खादीची चळवळ सशक्त बनवण्यास युवांची गरज
तत्त्वे,हिंद स्वराज आज शालेय अभ्यासक्रमात आहेत का? असा प्रश्न इला गांधी यांनी उपस्थित करून प्राथमिक शिक्षणाच्या पाश्चात्यीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच शालेय अभ्यासक्रम जर भारतीय मूल्यांपासून दूर गेले तर येणारी पिढीही स्वदेशी बाण्याकडे कशी वळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खादीची चळवळ सशक्त बनवण्यासाठी युवापिढीची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.