आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी एकमेकांना झोडपले गुंडांसारखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमिक शिक्षकांनी मुद्याची लढाई गुद्यावर आणत एकमेकांना गुंडांसारखे झोडपले. यामुळे काहींचे चष्मे तुटले तर काहींचे कपडे फाटले. माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जळगावकरांना रविवारी हे चित्र पाहायला मिळाले.

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी 1 वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. संस्थेचे अध्यक्ष संभाजी पाटील अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीचा अर्धा तास सभा शांततेत सुरू होती; पण विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू झाले, त्यावेळी मात्र सभासदांमध्ये कुजबुज सुरू झाली. एकामागून एक विषय पुढे येत गेले. प्रश्न विचारणे सुरू होते आणि खुलाशाची मागणी कायम होती. अशातच संस्थेतील वातानुकू लित यंत्र व कर्जाच्या वाटपातून फुगलेला नफ्याचा आकडा या मुद्यावरून वादाला सुरुवात झाली. सभासदांचा गोंधळ तब्बल दीडतास सुरूच होता.

हाणामारीने सभागृहात झाली पळापळ
अहवालातील चुका गंभीर असल्याचे सांगत परिपत्रक काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रिंटिंगचे बिल अदा करू नये, असा आग्रह धरण्यात आला. रावेरचे संचालक सुनील महाजन यांनी अचानक उठून अध्यक्ष मनमानी व हुकूमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर एरंडोलचे संचालक राजेंद्र देशमुख यांनीही कारभारावर टीका केली आणि वादाच्या ठिणगीने हाणामारीचा भडका उडाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये हाणामारी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला. यात अनेकांचे कपडे फाटले, चष्मे तुटले. यादरम्यान चापटा व बुक्क्यांचा सपाटा सुरू होता. गर्दीत अनेक जण खाली पडल्याने सभासदांच्या पायाखाली आल्याने गंभीर दुखापती झाल्या.

अध्यक्षांनाही विरोधकांनी रोखले
सभासदांचा संताप पाहता अध्यक्षांसह संचालक मंडळाने सर्व विषय मंजूर असल्याची घोषणा केली. तसेच बाहेर पडण्याचा प्रय} केला. परंतु व्यासपीठावरून उतरताना विरोधकांनी त्यांना घेरले. बाहेर पडू न देता त्यांच्याशीही दोन हात करण्याचा प्रय} केला. यादरम्यान मानद चिटणीस अजय देशमुख यांनाही धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले. सभासदांमध्ये जुंपलेली बघून अनेक संचालकांनी गर्दीचा फायदा घेत पोबारा केला.


कशासाठी घडले?
0 संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.
0 निवडणुकीसाठी काहींना स्वत:ला सभासदांसमोर सादर करायचे होते.
0 विद्यमान संचालक बदनाम झाले तर पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव सोपा होणार आहे.
0 विरोधकांना बदनाम करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी हे घडवले असाही दावा काहींनी केला आहे.

काय घडले?
0 पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालकांमध्ये दोन गट पडले.
0 छपाई बिलाच्या मुद्यावरून वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली.
0 हाणामारीत काहींचा चष्मा फुटला, काहींचे कपडे फाटले, कोणाच्या चपला तुटल्या.
0 काही खाली पडल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.


पुढच्या वर्षी निवडणूक
संस्थेची फेब्रुवारी 2014 मध्ये पंचवार्षिक निवडणूक आहे. पाच वर्षांनंतर संस्थेत सत्तांतर झाले होते. आता पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून 12 हजार 245 सभासद असलेल्या तसेच कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थेत नेतृत्व करण्याची इच्छा असलेल्या अनेकांनी सभेला हजेरी लावली होती. निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने अनेकांनी स्वत:ला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवल्यास राजीनामा
संस्थेत एक रुपयाचा भ्रष्टाचार नसून पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवल्यास सर्व संचालक मंडळ राजीनामा देऊन मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घोषित करेल. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी हा गोंधळ निर्माण केला. एसीसंदर्भात रजिस्टरमध्ये नोंद आहे. संस्थेचा दरवर्षी नफा वाढत आहे. विरोध करणारे संचालक दारूच्या नशेत होते. त्यांनी आजपर्यंत कधीच विरोध नोंदवला नाही. हा चमकोगिरीचा प्रकार आहे. संस्थेची बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. वेळ प्रसंगी त्याचे पदही रद्द होऊ शकते. संभाजी पाटील, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक पतपेढी

सत्ताधार्‍यांनी घडवलेला दुर्दैवी प्रकार
अध्यक्षांनी चार वर्षांत जामीनकीच्या कर्जाची र्मयादा वाढवली नाही. पर्यायाने स्पेशल कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे पतपेढीचा नफा फुगलेला दिसतो. संस्थेला दोन एसी व वॉटर कुलर भेट दिल्याची कुठेही नोंद नाही. तसेच सनदी लेखापालाला अँडव्हान्स पाच लाख दिले ही पद्धत संस्थेत नसून चुकीचा पायंडा पाडला जात आहे. या प्रश्नांवर खुलासा न देता सत्ताधार्‍यांनी जाणूनबुजून गोंधळ घातला. सभागृहाची मंजुरी नसतानाही सर्व विषय मंजूर केले. सभासद धारेवर धरतील हे लक्षात घेऊन सभा गुंडाळली. संस्थेच्या इतिहासातील ही दुर्दैवी घटना आहे. एस.डी.भिरूड, जिल्हाध्यक्ष, टीडीएफ