आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या मोसमात खासगी बसभाड्यात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दिवाळीचे निमित्त साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवासी भाड्यात तब्बल दुपटीने वाढ केली आहे. खासगी ट्रॅव्हल्सचालकांच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतोय. दिवाळीच्या सणात अतिरिक्त नफा खिशात घालण्यासाठी खाजगी व्यावसायिक गर्दी पाहून भाडे ठरवित आहेत. जळगावहून पुण्यासाठी 300 रुपये प्रवासभाडे असताना ते 550 रुपयांवर पोहचले आहे. यासह पुणे, मुंबईकडे जाणार्‍या महामंडळाच्या बसभाड्यातही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या तीन दिवसात ट्रॅव्हल्सचालकांनी ही दरवाढ आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

शहरातून दररोज सुमारे 30 बस राज्यातील प्रमुख शहरांमध्ये धावतात. सणानिमित्त मेट्रोसिटीमध्ये नोकरीस असलेले चाकरमानी गावाकडे येत असतात. यासाठी लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी प्रवासी स्लीपर आणि वातानुकूलित गाड्यांना प्राधान्य देतात. एसटी महामंडळाकडून स्लीपर गाड्यांची सुविधा पुरविली जात नाही तर रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले असते. त्यामुळे प्रवाशांना दुप्पट, तिप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. ऑनलाइन तिकिटाच्या नावावरही ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांचा छळ केला जाताना दिसतो.

जळगाव शहरातून पुणे, मुंबईकडे जाणारा वर्ग मोठा असला तरी, त्यापेक्षा सुटीत तिकडून इकडे येणारे प्रवासी अधिक असतात. सुटी संपून पुन्हा गावाकडे जाण्यासाठी आधीच आरक्षण करून घेण्याकडे प्रवाशांचा कल असतो. मात्र दिवाळीतील सहा दिवसात त्यांची कमालीची लूट होताना दिसते.


ट्रॅव्हल्सची संख्या
पुणे - 25
मुंबई- 15
अहमदाबाद- 02
सुरत- 02
इंदौर- 03
नागपूर- 03

तुलनात्मक भाडे

जळगाव-पुणे
एसटी - 385 (दिवसा)
एसटी - 452 (रात्री)
ट्रॅव्हल्स - 450 ते 500 (दररोज बदलते भाडे)

जळगाव-मुंबई
एसटी - 419 (दिवसा)
एसटी - 492 (रात्री)
ट्रॅव्हल्स - 650 ते 750 (दररोज बदलते भाडे)

बेकायदा वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई सुरू आहे. भाडेवाढीचा प्रश्न आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. यासंबंधी नियमावली तयार करण्याचे शासनाचे काम सुरू आहे, मागणी व उपलब्धता यावर ही भाडेवाढ ठरत असते. यात आम्ही काही करू शकत नाही. एस.एस.वारे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

वर्षभरात दिवाळीचे आठदिवस हाच ट्रॅव्हल्सचा हंगाम असतो. अन्य वर्षभर प्रवासी आमच्याकडे गरजेनुसारच येतात. अन्य दिवसात भाड्यांबद्दल कुठलाही वाद नसतो. मात्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाढ करावी लागते. प्रकाश साहित्या, ट्रॅव्हल्सचालक

अशा आहेत तक्रारी..
0 वातानुकूलित बसचे भाडे घेऊनही काही अंतर गेल्यावर एसी बंद करणे
0 क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे.
0 प्रवासी मागेल त्या थांब्याचे तिकीट देणे, मात्र पोहचल्यावर गाडी न थांबवणे
0 वेळेचे कुठलेच बंधन न पाळणे
0 बेदरकारकपणे गाडी पळवणे
0 एजंटमार्फत तिकीट विक्री करून प्रवाशांना सोयींचे आमिष देणे.