आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी वाहनचालकांची चांदी; प्रवाशांचे मात्र निघाले ‘दिवाळे’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने सणासुदीला खासगी वाहनचालकांची कधी नव्हे, अशी भरमसाठ कमाई करून ‘दिवाळी’ साजरी हाेत अाहे. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा भाडे देऊनही वाहतुकीला वाहने उपलब्ध हाेत नसल्याने सामान्य प्रवाशांचे सणासुदीला ‘दिवाळे’ निघाले अाहे. या संपाची सर्वाधिक झळ महिला लहान मुलांना बसली असून माहेरची अाेढ लागून असलेल्या सासुरवासींच्या डाेळ्यात एेन दिवाळीला अश्रू तरळले अाहेत. 
 
दिवाळीच्या सुट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बसेसचा सर्वाधिक प्रवासी लाभ घेतात. खासगी वाहनचालकांच्या तुलनेत सुरक्षित अाणि खिशाला परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते. मात्र, एेन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल हाेत अाहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशी एेन लक्ष्मीपूजनासाठी घर गाठताना प्रवाशांचे हाल हाेत अाहेत. खासगी बसेसवाले प्रवाशांकडून भाडे वसूल करीत अाहेत. अजिंठा चाैफुलीवर खासगी वाहनचालक, रिक्षाचालक, मालवाहू गाड्या अाणि महामार्गावर जाणाऱ्या ट्रकचा अाश्रय घेत प्रवाशांनी प्रवास केला. दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यात अालेल्या छाेटी मालवाहू वाहने चालकांनी थेट प्रवासी वाहतुकीसाठी उभ्या केल्या हाेत्या. नेरीनाका येथील खासगी लक्झरी थांब्यावरदेखील प्रवाशांची गर्दी हाेती. शहरातून भुसावळ, जामनेर, धरणगाव, पाचाेरा, पहूर, शेंदुर्णी येथे जाणाऱ्या वाहनांची प्रवाशांकडून विचारणा सुरू हाेती. 
 
प्रशासनाकडून अाढावा 
संपामुळे प्रवाशांचे हाल हाेत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सुटीवर गेली नाही. खुद्द जिल्हाधिकारी शहरातच थांबून अाहेत. गरज पडल्यास हाेमगार्ड अाणि खासगी चालकांच्या मदतीने बस सुरू करण्यासाठी यंत्रणेकडून गुरुवारी अाढावा घेण्यात अाला. तहसीलदार अमाेल निकम यांनी दुपारी वाजता बस अागारात जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. संपात सहभागी झाले तर गुन्हे दाखल करण्याची तंबीदेखील देण्यात अाली. दरम्यान, वरच्या पातळीवर बाेलणी सुरू असल्याने प्रशासनाने तूर्त वाट पाहण्याची भूमिका घेतली. लक्ष्मीपूजन अाटाेपल्यानंतर सासुरवासीनी महिला माहेरी जाण्यासाठी निघतील, तेव्हा मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता अाहे.  

मालवाहू गाड्यांचा पर्याय
खासगी वाहनांची संख्या पुरेशी नसल्याने अनेक मालवाहू वाहने रस्त्यावर प्रवासी वाहतूक करीत अाहेत. छाेटी मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, ट्रक, मेटाॅडाेअर, छाेटा हत्ती तर काेठे बैलगाड्यांनी प्रवासी प्रवास करीत अाहेत. मालवाहू गाड्यांमध्ये प्रवासी काेंबून भरले जात अाहेत. संपूर्ण गाडी भरल्याशिवाय चालक निघत नसल्याने प्रवाशांचा अक्षरक्ष: छळ हाेत असल्याच्या बाेलक्या प्रतिक्रिया उमटत अाहेत. 

एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली 
जळगावआगाराचे संपकरी चालक देविदास सुकलाल सपकाळे (वय ५२, दादावाडी) यांची सकाळी अागारातच प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून संपकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे. या पार्श्वभूमीवर घाबरलेल्या देविदास सपकाळे यांना छातीत दुखू लागल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...