आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी प्रवास दर चारपटीने वाढले; भुर्दंडामुळे प्रवासी त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातून दाेन तासांच्या अंतरावर असलेल्या जळगावला जाण्यासाठी खासगी वाहनांची पाच ते सहा तास प्रतीक्षा करण्याची वेळ गुरुवारी प्रवाशांवर अाली. त्याचवेळी शिरपूरच्या एका तासासाठी तीन तासांचा वेळ वाया घालवावा लागला. खासगी वाहने पुरेशी मिळत नाही.
 
एसटीच्या अागारात येत नाही. त्यामुळे नेमके कुठून वाहन पकडावे, ही द्विधावस्था दिवसभर प्रवाशांमध्ये हाेती. नाशिकला जाण्यासाठी दाेनशे रुपयांएेवजी पाचशे ते सहाशे रुपये लागत अाहेत. तर मुंबईचा प्रवासही असाच एक हजार ते बाराशे रुपये देऊन करावा लागत अाहे. पाराेळ्याच्या एका तासाच्या अंतरासाठीही दीडशे रुपये माेजावे लागत अाहेत. त्यामुळे संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रवासी माेठ्या प्रमाणात त्रस्त झालेले दिसत हाेते. 
 
शहरातील स्थानिक अागारात तिसऱ्या दिवशीही एसटी बसेस थांबून हाेत्या. कर्मचाऱ्यांनी सकाळी अागारात अर्धनग्न निदर्शने केली. काही जणांनी काळे कपडे घालून शासनाचा निषेध केला. तिसऱ्या दिवशी बसस्थानक अागाराच्या परिसरातील व्यवसाय पूर्ण बंद पडलेले दिसून अाले. प्रवाशीच नसल्यामुळे अागारातही केवळ पाेलिस बंदाेबस्तासाठी असलेली व्हॅन तुरळक प्रवासी वगळता शुकशुकाट जाणवत हाेता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी व्यावसायिक माेठ्या प्रमाणात दर अाकारत अाहेत. शहरातून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या माेठी अाहे. जळगाव तसेच नाशिक मुंबईकडे जाणाऱ्यांना पर्यायच सापडत नाही, अशी स्थिती अाहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनात मागेल तितके पैसे देऊन प्रवास करावा लागत अाहे. 
 
शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या महामार्गावर प्रवासी उभे राहिलेले अाढळून येत अाहेत. विशेष बाब म्हणजे महिलाही ट्रकसारख्या वाहनाचा अाधार घेऊन प्रवास करताना दिसतात. खासगी प्रवासी वाहने तुडुंब भरून वाहत अाहेत. त्यात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेले जातात. त्यांच्याकडून जास्तीची रक्कम अाकारली जाते. शिरपूर तसेच साक्री पाराेळा त्याचबराेबर नंदुरबार या तासाभराच्या अंतरावर असलेल्या शहरांमध्ये जाण्यासाठी ५० ते ६० रुपये भाडे लागते. गुरुवारी त्यात वाढ करून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दीडशे ते दाेनशे रुपये दराने वाहतूक केली. जळगावसाठी दाेनशे ते अडीचशे तर नाशिक मुंबईचे दर त्यापेक्षा दुप्पट अाकारले जात हाेते. एेन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावाकडे जाणाऱ्यांची एकच गर्दी झाली. त्यामुळे प्रवासही महागला. तिसऱ्या दिवशीही संप सुरूच असल्यामुळे आता प्रवाशीही सजग झाले आहेत. एसटी जाणार नसल्यामुळे गुरुवारी सकाळपासून प्रवासी फिरकले नाहीत. 

याशिवाय मध्यवर्ती आगारालगत असलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत आपल्या इच्छितस्थळी पोहाेचण्याला प्राधान्य दिले. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या यंत्रणेने कंबर कसली आहे. या कालावधीत खासगी प्रवासी वाहतुकीला सूट देताना दिवाळीची वरकमाई करण्याची नामी संधी परिवहन विभागाच्या यंत्रणेला मिळाली आहे. दरम्यान शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करीत कामगारांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती आगारात शर्ट काढून अर्धनग्न होत निदर्शने केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळे कपडे परिधान करीत निषेध नोंदवला. या वेळी इंटकचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, राज्य सरचिटणीस चंद्रकांत गोसावी यांच्यासह कामगारांचा सहभाग होता. 
 
रिक्षाचालकांचा बुडाला रोजगार मध्यवर्तीबसस्थानकाबाहेर अधिकृत रिक्षा थांबा आहे. दिवस आणि रात्री मिळून या ठिकाणी ३०० रिक्षाचालकांची उपजीविका अवलंबून आहे. दिवाळीच्या सणाच्या कालावधीत प्रत्येक रिक्षाचालकांना १००० ते १५०० रुपये दिवसाची कमाई अपेक्षित असते. मात्र त्यात शंभर टक्के घट आहे. संपामुळे कोणीच प्रवासी मिळत नसल्यामुळे रिक्षाचालकांनी दोन दिवसांपासून रिक्षा बंद ठेवणेच पसंत केले आहे. 
 
मध्यवर्ती आगाराचे सर्वाधिक नुकसान : धुळे विभागात शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हे सर्वात मोठे अधिक उत्पन्न असलेले बसस्थानक आहे. प्रतिदिवस २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. ७५० कामगार असलेल्या बसस्थानकात लक्ष्मीपूजनानंतरचे उत्पन्न प्रतिदिवस २५ ते ३० लाखांवर जात असते. गतवर्षी लक्ष्मीपूजनानंतरच्या दुसऱ्या दिवशी २५ लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी मात्र मोठी तूट सहन करावी लागत आहे. संप जर दोन दिवसांत मिटला नाही तर मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. २२ तारखेला मध्यवर्ती आगारातून आठ बसेसचे सीट आरक्षित आहेत. त्याचा तोटा सहन करण्याचा धोका आहे. 
 
किरकोळ विक्रेत्यांवर संक्रांत 
एसटीआगारातील विक्रेते त्यांच्यावर अवलंबून असलेल्या २५० मजुरांचा तीन दिवसांपासून रोजगार बुडत आहे. हातावर पोट असलेल्या २५० जणांना एेन दिवाळीत संक्रांत असल्याचे जाणवत आहे. दिवाळीत प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे कमाई अधिक होत असते. मात्र, ही कमाई थांबली आहे. पे अॅण्ड पार्किंगमध्येही दररोज होणारी पार्किंग थंडावली आहे. 
 
विभागाचे तीन कोटींचे नुकसान 
धुळेविभागातील दररोजच्या चार हजार ३०० बसफेऱ्यांपैकी तीन दिवसांत एकही फेरी झालेली नाही. प्रतिदिवस एक कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय इतर माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही तोटा सहन करावा लागलेला आहे. सध्या विभागीय कार्यालयातील कर्मचारी वगळता सर्व ७८० कामगार संपावर आहेत. 
बातम्या आणखी आहेत...