आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Suicide Issue At Jalgaon, Divya Marathi

‘अब मुझे मॉँ कौन बुलायेगा’ मृत प्रियंका मुखर्जीच्या आईची आर्त हाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रूममेटच्या त्रासामुळे आत्महत्या केलेल्या प्रियंका मुखर्जीचे कुटुंबीय सोमवारी दुपारी 12.10 वाजता जळगावात आल्यानंतर त्यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनगृहाकडे पाहत तिच्या आईने हंबरडा फोडला.

‘हमारा घर इतना बडा है, और मेरी बेटी यहा कहा पडी है’ म्हणत शवविच्छेदनगृहात तिने प्रवेश केला. तेथे प्रियंकाचा मृतदेह पाहताच सर्वांनीच आक्रोश केला. ‘अब मुझे मॉँ कौन बुलायेगा’ म्हणत आईने प्रियंकाचा चेहरा हातात घेऊन ती वारंवार प्रियंकाला घरी चालण्याची विनंती करत होती. ‘उसे थंड लग जायेंगी, उसे मेरे पास लाओ’ असे सांगत होती. प्रियंकाचे वडील, काका, मामा आणि मामी यांनीही आक्रोश केला.

हिनवल्यामुळेच केली आत्महत्या
प्रियंकाने आत्महत्या केल्याची माहिती शनिवारी रात्री 1.30 वाजता तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती. त्यानंतर प्रियंकाचे वडील डॉ. नयन मुखर्जी, आई लक्ष्मी, काका सुभाषिश मुखर्जी, मामा सोमुजीत चॅटर्जी, शिक्षक प्रसून मुखर्जी हे सोमवारी दुपारी 12.10 वाजता जळगावात आले. दुपारी 12.30 वाजता त्यांनी सिव्हिलमध्ये प्रियंकाचा मृतदेह पाहिला. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता कुटुंबीय नशिराबाद पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे गुन्हा दाखल केला.

जळगावातच अंत्यसंस्कार
प्रियंकाचा मृत्यू होऊन 48 तास होऊन गेले. पुन्हा 32 तासांचा प्रवास करून तिचा मृतदेह पश्चिम बंगाल येथे नेणे शक्य नसल्याने तिच्यावर सायंकाळी 6 वाजता नेरीनाका येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. महिला संघटनांच्या पदाधिकारी निवेदिता ताठे, सरिता माळी, स्मिता वेद, वैशाली विसपुते, शोभा हंडोरे, नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी आदींनी दिवसभर कुटुंबीयांचे सांत्वन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत केली. डॉ.उल्हास पाटील यांनी स्मशानभूमी येथे हजेरी लावत डॉ.मुखर्जी यांच्यासह महिला संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. अंत्यसंस्कारानंतर मुखर्जी कुटुंबियांनी शहरातील एका खासगी लॉजमध्ये मुक्काम केला. मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रियंकाच्या अस्थी नाशिक येथे नेणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगीतले.

महाविद्यालयाकडून मदत नाही
सोमवारी सकाळी प्रियंकाचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. मात्र डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय प्रशासनाकडून कुणीही रुग्णालयात हजर नव्हते. कुटुंबीय नशिराबाद पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर डॉ. प्रमोद भिरूड, वसतिगृहाच्या रेक्टर अर्चना भिरूडे उपस्थित होत्या.

महाविद्यालयचा निष्काळजीपणा
आमच्या मुलीसोबत झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा समोर आला आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत लढा देणार आहोत. डॉ.नयन मुखर्जी, प्रियंकाचे वडील

गांभीर्याने दखल घेतली
या घटनेची महाविद्यालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. दोषींवर कडक कारवाई करणार आहोत. डॉ.उल्हास पाटील

तिघींना अटकपूर्व जामीन मंजुर
सोमवारी दुपारी तीनही संशयित मुलींतर्फे अँड.पंकज अत्रे यांनी न्यायाधिश एन.आर.क्षिरसागर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोणत्याही साक्षिदारांवर दबाव न आणण्याची अट टाकण्यात आली आहे. तर यावर 30 मे रोजी सरकारपक्षाचे म्हणने मागवले आहे.