आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- जीवन खडतर असते तर मृत्युमुळे सगळ्या त्रासातून सुटका होते असे म्हटले जाते मात्र मृत्युनंतरही ही वाट बिकटच राहिली तर काय करावे? अशीच काहीशी वेळ आसोदेकरांवर सध्या आली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत कमरेएवढय़ा पाण्यातून त्यांना वाट काढावी लागत आहे. आधीच स्मशानभूमीची झालेली दुरवस्था, त्यातच रस्त्यांची दयनीय स्थिती आणि यातच या मार्गावर वीटभट्टय़ांचा वाढलेला विस्तार यामुळे स्मशानातील ओट्यांपर्यंत पोहचण्याची वाटच बंद झाली आहे. पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी पुलावरच साचत असल्याने अत्यंत कसरतीने मार्ग काढावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
थोड्याशा पावसामुळे हा मार्गच बंद होऊन अंत्यविधीसाठी नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्मशानभूमीला पाण्याने वेढले आहे. रविवारी सकाळी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना या पाण्याने अडविले. मात्र अधिकवेळ थांबणे कठीण असल्याने नागरिकांनी कसरतीने मृतदेहासह पाण्यातून मार्ग काढीत अंत्यविधी पार पाडले.
स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा दुसरा मार्गही अत्यंत अरुंद व चिखलाचा असल्यामुळे या रस्त्याशिवाय पर्याय नाही. पुलावर पाणी वाढल्याने विधीसाठी काही जणांनीच जीव धोक्यात घालून अखेर मार्ग काढला, अन्य नागरिकांना मात्र दूरवरच थांबावे लागते. या स्थितीबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. परिसरात ग्रामपंचायत प्रशासनाने संमती दिलेल्या वीटभट्टय़ांनी दूरपर्यंत आपले प्रस्थ वाढविले आहे. परिणामी पाण्याची वाटच बंद झाली आहे.
ग्रा.पं.चे अक्षम्य दुर्लक्ष
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मभूमीमुळे ख्याती असलेल्या असोदा गावाची लोकसंख्या 30 हजारावर असून या गावाने पंचायत समिती सभापती, जिल्हापरिषद सदस्यांसह अनेक पदे दिली. तरीही गावातील स्मशानभूमीची अवस्था अजूनही दयनीय आहे. दोन वर्षांपूर्वी दानशूर नागरिकांच्या मदतीने स्मशानातील ओट्यांची दुरुस्ती केली गेली. यानंतर रस्त्यांचीही दुरुस्ती झाली, मात्र ती फार काळ टिकली नाही. गावापासून स्मशानभूमीपर्यंतचा अर्धा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या भागात जमिनींच्या भावाने उच्चांक गाठला आहे, आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.